शिवजयंती SPECIAL | छत्रपती शिवराय...आमचे अखंड प्रेरणास्त्रोत !

'कोकणसाद'चे उपसंपादक प्रा. रुपेश पाटील यांचा खास लेख
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 19, 2023 10:33 AM
views 664  views

छत्रपती शिवाजी महाराज...

नुसतं नाव जरी उच्चारलं, तरी आमच्या धमन्यातलं रक्त आपोआप सळसळतं. कारण 'शिवाजी' हे फक्त नाव नाही, तर शिवाजी म्हणजे जगण्याचे सर्वोत्तम परिमाण आहे. 'जे जे उदात्त आणि विधायक' ते करण्याची प्रवृत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत.

शिवरायांचे गुणगान करताना आम्ही सहज म्हणतो,

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण, महाराजाधिराज, श्रीमंत महाराज, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की.... जय..!'

 ही किंकाळी उच्चारताच आबाल-वृद्ध, युवाई, महिला अशा साऱ्यांनाच एक स्फूर्ती येते. एवढी अफाट जादू फक्त शिवाजी या तीन अक्षरात आहे.

 खरोखरचं धन्य ती राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब... ज्यांच्या उदरातून छत्रपती शिवराय यांनी स्वराज्य निर्मितीसाठी जन्म घेतला.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या या पावन मातीत तुम्ही-आम्हीही जन्म घेतला, म्हणून स्वतःला नशीबवान मानले पाहिजे.


छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना-

केवळ पन्नास वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शिवरायांनी आपल्या अंगी असलेल्या प्रचंड दूरदृष्टी, कुशल नेतृत्व, भावनिक संघटन, एक नियोजनबद्ध प्रशासन, कुशल राज्यकर्ता, प्रजाहितदक्ष उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून आजही तमाम शिवप्रेमींच्या मनावर छाप सोडली आहे. महाराजांचे चरित्र म्हणजे जगण्याची प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे. छत्रपती शिवराय म्हणजे अखंड सकारात्मक ऊर्जास्त्रोत असून अनेक राज्यकर्त्यांना आदर्शवत व प्रेरणादायी शिकवण आहेत, हे मानलेच पाहिजे.

आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे खरे चरित्र लोकांना कळणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्र आणि संपूर्ण देश दंगलमुक्त तर होईलच, त्याबरोबरच महाराज आम्हाला कळले तर निश्चितच आमची पूर्ण परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. कारण आजच्या पिढीला महाराजांची दूरदृष्टी, राष्ट्रभक्ती, सर्वधर्मसमभाव व विज्ञानवादी विचारधारा कळाली तर आजची तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रगती करू शकतील. प्रेरणा आणि उत्साह याचे नाव म्हणजे छत्रपती शिवराय आहेत. आज प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी विशेष गुण आपल्यामध्ये घालून देणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असून आजच्या तरुणांना ते व्यवस्थितरित्या समजून घेणे गरजेचे आहे. असे झाले तर ते प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतील. एवढी प्रचंड ताकद छत्रपती शिवरायांच्या चरित्रात आहे. छत्रपती शिवरायांची प्रेरणा जगाने घेतली. अनेकांनी शिवरायांचा आदर्श घेतला. मात्र आज आपण छत्रपती शिवरायांना किती समजून घेतले? हे आजच्या काळात आत्मपरीक्षणाचे आणि आत्मचिंतनाचे वाटते.


शिवपूर्वकालीन परिस्थिती-

छत्रपती शिवराय यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्यावेळी महाराष्ट्राच्या  उरावर तब्बल पाच सुलतानी सत्ता थयाथया नाचत होत्या. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंडाची कुतुबशाही, उत्तरेच्या दिल्लीकडून मोघलशाही तर गोव्याकडून पोर्तुगीज हे देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत होते. अशा परस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे जगणे मुश्किल झाले होते. शेती, माती आणि रक्ताची नाती पायदळी तुडवली जात होती. महाराष्ट्रातील बाया - बापड्यांवर, लहान थोरांवर अनन्वित अत्याचार केले जात होते आणि अशावेळी माँसाहेब जिजाऊंच्या मनामध्ये स्वराज्य निर्मितीची संकल्पना रुजू लागली. त्यानंतर आपल्या आईच्या स्वप्नांसाठी आणि स्वराज्य या साडेतीन अक्षरासाठी छत्रपती शिवराय पुढील पन्नास वर्ष अविरत झुंजत राहिले, लढत राहिले.

प्रत्येक क्षणी मृत्यूच्या दारात जाऊन, रयतेच्या रक्षणासाठी प्राण्यांची बाजी लावत आपली कर्तबगारी सिद्ध करत राहिले.


छत्रपती शिवराय समजून घेण्याची गरज :

छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही 'जाणता राजा' म्हणतो. कारण गेल्या ३९३ वर्षात शिवाजी महाराजांच्या विचाराने आपला देश चालविण्यात आम्हाला अपयश आल्याचे सिद्ध होते.

महाराजांचे संपूर्ण जीवन हे विज्ञानाधिष्ठित असून सातत्याने नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करून महाराजांनी स्वराज्य सुजलाम सुफलाम ठेवले होते. आपले स्वराज्य वाढविण्यासाठी लष्करी व्यवस्थापन कसे असावे?, सैनिकांना कशाप्रकारे पगार दिला जावा? राष्ट्राची सुरक्षा करण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा कशाप्रकारे निर्माण करता येते? हे संशोधन करून त्याची सिद्धता महाराजांनी केली. याशिवाय मिळविलेल्या स्वराज्यातील रयत सुखी कशी होईल? यासाठीही विकासात्मक गोष्टींवर महाराजांनी संशोधन केले. म्हणूनच महाराज राष्ट्रपुरुष आणि खऱ्या अर्थाने रयतेचे जाणते राजे झाले. माणसाचे भवितव्य आकाशातील ग्रह तारे आणि मुहूर्तावर अवलंबून नसून ते त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, हे महाराजांनी कृतीतून दाखवले आहे. शून्यातून स्वराज्य निर्माण करणे हे दुरापस्त असताना महाराजांनी ते लीलया निर्माण केले. केवळ निर्माण केले नाही तर ते टिकवले, वाढवले आणि येथील रयतेला आपल्या स्वाभिमानाची जाणीव देखील करून दिली. महाराजांचा कारभार असा शास्त्रशुद्ध होता की, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचाराने हा महाराष्ट्र स्वराज्य संरक्षणासाठी त्यांच्याच वाटेने चालू राहिला. जगाच्या पाठीवर राजाच्या मृत्यूनंतरही त्याने चालू केलेली लोककल्याणकारी व्यवस्था कायम करणारा एकमेव युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवराय होत. त्यांच्या आदर्श राज्यकारभाराच्या संकल्पनेतूनच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही भारताच्या लोकशाही राज्यव्यवस्थेतील घटना लिहिताना पानापानावर 'स्वराज्याचे रयत कल्याणकारी धोरण' मांडलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मुसलमानांचे अतिरंजीत युद्धप्रसंग सांगून, त्यात काहीतरी काल्पनिक प्रसंग जाणीवपूर्वक घुसडून काही जातीयवादी मंडळी बहुजन समाजातील तरुणांची दिशाभूल करून, त्यांच्या हातून राष्ट्राचे नुकसान करताना दिसतात. परंतु त्याचवेळी या तरुणांचे 'सॉफ्ट अतिरेकी' निर्माण करून त्यांचे नुकसान करतानाही आज राजरोसपणे दिसत आहेत. वाचक मित्रहो, आज २१ व्या शतकात विज्ञानाने बरीच प्रगती केलेली असूनही, आज महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही. शिवकाळात 'डोंगर तेथे किल्ला आणि किल्ला तेथे तलाव' होते. तलाव कसे, कोठे बांधावे? हे महाराजांचे तंत्र आजही राजकारण्यांना शिकवण देणारे आहे. मात्र दुर्दैव असे की, आम्ही इतिहासात खोलवर जात नाहीत. इतिहास वाचत नसल्याची किंमत आज आम्हाला मोजावी लागली आहे. 'सार्वजनिक स्वच्छता ते पर्यावरण संरक्षण' आणि 'टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू' बनविण्याबाबत महाराजांचा प्रचंड दूरदृष्टीकोन आम्ही शिवचरित्रातून अभ्यासला पाहिजे. महाराजांचे सैन्य व्यवस्थापन आणि किल्ले बांधणीचे प्रयोग आणि त्या बांधकामासाठी वापरलेले कसब हे देखील आम्ही तपासले पाहिजे. एकदा केलेले बांधकाम तब्बल ३५० वर्षे कसे शाबूत ठेवता येते?, हे आम्ही शिकलो असतो तर आमचा देश आज जगात नंबर एक  राहिला असता. परंतु दर पाच वर्षांनी पुन्हा तेच काम करून अब्जावधी रुपयांचा विकास निधी वाया करणारी आजची भ्रष्टाचारी राजकीय व्यवस्था आम्हाला नाईलाजास्तव सोसावी लागली नसती. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील उत्पन्नाचे मार्ग, स्वराज्याचा खर्च, बचतीचे धोरण यावरही आम्ही शिवचरित्रातून अभ्यास केला पाहिजे. त्यांनी स्वराज्यात केलेली कर्मचारी भरती, त्याचे धोरण, त्याची बदली कशी करावी?, त्यांना बढती कशी द्यावी? आणि काम चुकाराला कसे योग्य शासन करावे?, याबाबतचा दंडकही प्रशासन चालवणाऱ्यांना शिवचरित्रातून मिळतो.

 मात्र त्यासाठी गरज आहे ती शिवचरित्राच्या अध्ययनाची.


जगातील कोणत्याही यशस्वी माणसाचे रहस्य म्हणजे त्याच्याकडे असलेले सुयोग्य संवाद कौशल्य. इतरांवर छाप पाडणे, त्याला आपली योग्य भूमिका पटवून देणे आणि त्याला आपल्या मुद्द्याशी सहमत करून घेणे याबाबत महाराजांचा वास्तववादी विचारही शिवचरित्रमधून आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. महाराजांचे संवाद कौशल्य आणि इतरांना पटवून देण्याची प्रवृत्ती असे कितीतरी मॅनेजमेंट क्षेत्रातले गुण शिवचरित्रात पहावयास मिळतात. आज शिवचरित्र अभ्यासण्याची प्रचंड गरज आहे. कारण आजच्या एकूण परिस्थितीला, प्रश्नांना सर्वोत्तमरित्या सोडविण्याची ताकद महाराजांच्या चरित्रात दडलेली आहे. त्यासाठी आम्ही 'घरोघरी शिवचरित्राचे पारायण' करणे काळाची गरज बनली आहे.

आगामी काळात आम्हाला जगावर राज्य करायचे असेल तर आम्हाला घरोघरी शिवविचारांचा जागर करावा लागेल. असे झाले तरच खऱ्या अर्थाने 'स्वराज्याचे सुराज्य' व्हायला वेळ लागणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे.

वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा..!