शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत असताना आपण स्वत: शिवचरित्राचे नीरक्षीर विवेकबुद्धीने किती पालन करतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारून बघावा. ज्यांना शिवराय पूर्णत: ज्ञात नाहीत किंवा ज्यांच्या मनात काही कारणांमुळे गैरसमज आहेत, अशांना खरे शिवराय पटवून देण्यासाठी झटणे गरजेचे आहे. अन्यथा पुतळे कितीही उभारले, तरी त्याचा उपयोग शून्य.
..........
गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे गोव्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. कारणही तितकेच गंभीर हाेते. दिवाडी बेटावरील सां माथियस ग्रामपंचायतीच्या आवारात उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली होती. या प्रकारानंतर तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन गटांत हातघाई होण्यासारखी स्थिती निर्माण झाली. सुदैवाने पोलिसांनी वेळीच कुमक वाढवून स्थिती नियंत्रणात आणली. या एकूण घटनाक्रमाची पार्श्वभूमी तशी स्फोटकच होती. हिंदवी स्वराज या संघटनेने पंचायतीच्या मोकळ्या जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी पंचायत मंडळाला प्रस्ताव सादर केला. मात्र त्याला एका महिला पंचाने आक्षेप घेतल्यामुळे हा विषय ग्रामसभेत चर्चेला आणून त्यावर मतदान घ्यावे, असे ठरविण्यात आले. ग्रामसभेवेळी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून पुतळा उभारण्याच्या बाजूने ८५ टक्के मतदान केले आणि पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर झाला. यावेळी काहींनी विरोध दर्शविला होता. त्यात ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात होते. त्यांना न जुमानता बहुमताच्या जोरावर पुतळा उभारण्यात आला. पण ज्याची भीती होती, तेच घडले. अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेऊन महाराजांच्या पुतळ्याची नासधूस केली. ज्याचे पडसाद लगेच उमटले आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे शमलेही.
एक गोष्ट मान्य करायला हवी की, शिवाजी महाराजांविषयी अजूनही गोव्यातील बहुतांश ख्रिस्ती समाजात अढी आहे. अज्ञानामुळे असेल किंवा अपप्रचारामुळे असेल. पण महाराजांविषयी माहिती मिळवून त्यांचे चरित्र जाणण्याची जिज्ञासा ख्रिस्तींमध्ये फारशी दिसत नाही. ही एक खूप जुनी अडचण आहे आणि दिवसेंदिवस ती बळावत चालली आहे. सांस्कृतिक वैविध्य असलेल्या गोव्यात ही गोष्ट खटकतेच. इथल्या धार्मिक, सामाजिक सौहार्दाचे गोडवे गायले जात असताना ख्रिस्ती समाज शिवाजी महाराजांविषयी इतका फटकून का वागतो, याचा अभ्यास ना त्या धर्मातील सुशिक्षित, विचारवंतांनी केला ना हिंदू धर्मातील शिवप्रेमींनी केला. गोव्यात खरी गरज आहे ती शिवचरित्र घराघरांत पोहोचविण्याची. शिवाजी महाराज हे धर्मवेडे होते, हा गैरसमज दोन्हीकडच्या काही लोकांनी पिढ्यानपिढ्या कुरवाळून ठेवला आहे. केवळ धर्मरक्षण, लढाया, छापेमारी, माेहिमा, राज्यविस्तार, तह, करार एवढ्यापुरतेच शिवचरित्र मर्यादित नाही. त्या पलीकडे शिवरायांचे असलेले उदात्त व्यक्तित्व, प्रागतिक विचारांचा आणि कुठल्याही वर्चस्ववादाला न जुमानणारा सुधारणावादी खंबीर नेता, उत्तम व्यवस्थापन कौशल्य असलेला एक अतुल्य प्रशासक आदी लोकाेत्तर पुरुषांचे गुणधर्म अंगिकारलेला सर्वगुणसंपन्न राजा ही शिवरायांची खरी प्रतिमा. पण काही घटकांना ही प्रतिमाच समोर आणायची नाही. त्याउलट शिवाजी महाराज हे कसे कट्टर धर्मवेडे होते आणि केवळ त्यांच्या याच गुणाचा आज आपण तितक्याच कट्टरतेने अंगिकार करून आपले वर्चस्व कसे सिद्ध करायला हवे, याची अहमहमिका लागलेली दिसते. हे चित्र केवळ वेदनादायक नव्हे, तर समाजहितासाठी घातकसुद्धा आहे.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोण होते, याची उजळणी पुन्हा एकदा करण्याची वेळ आली आहे. एका विशिष्ट हेतूने ठराविक लोकांनी शिवाजी महाराजांना प्रतिमाबद्ध करण्याचा चालविलेला खेळ उघडा पाडण्याची गरज आहे. राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे. आता तर हा खेळ इतका विकोपाला गेला आहे की, महाराज ‘तुमचे की आमचे’ यावर राजकीय रस्सीखेच सुरू आहे. खरे तर ही चांगलीच गोष्ट मानायला हवी. शिवाजी महाराजांच्या प्रती असलेली निष्ठा ही चुरशीचा भाग असायला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र त्यामागचे भ्रष्ट हेतू लक्षात घेतले, तर शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि या राजकारणी ढोंगी ‘गनिमांचा’ काडीचाही संबंध नसल्याचे दिसून येते. केवळ पुतळे बसविले, मोठमोठे फ्लेक्स झळकविले, वेशभूषा स्पर्धा घेतल्या, लांबलचक यात्रा काढल्या म्हणजे शिवचरित्राचे पाईक होणे नव्हे. शिवाजी महाराजांचे विचार, त्यांची राजनीती आपण किती अमलात आणली, याचा विचार राजकारण्यांनी करायला हवा.
जे राजकारण्यांच्या बाबतीत, तेच तुमच्या आमच्या बाबतीत. शिवचरित्राचे पाईक बनत असताना केवळ घोषणा देऊन आणि बाह्योपचारांनी स्वत:ला नटवून चालणार नाही. शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली की, अनेकांना शिवप्रेमाचे उमाळे येतात. फेसबुक, वॉटसअॅपवर डीपी बदलण्यापासून ते शिवजयंती साजरी करण्यापर्यंत शिवप्रेमाचे प्रदर्शन करण्याकडेच अनेकांचा जास्त कल असतो. एका अर्थाने शिवजयंती हा एक इव्हेंट किंवा उत्सव बनत चालला आहे. प्रश्न हा आहे की, शिवाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापासून आपण काय शिकतो? शिवरायांच्या विचारांचे पाईक व्हायचे म्हणजे काय करायचे? वाहनावर महाराजांचा फोटो लावायचा की ‘विजेसारखी तलवार चालवून गेला...’ ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक...’ असले मेसेज सोशल मीडियात फॉरवर्ड करत बसायचे? महाराजांचा फोटो, पुतळा पुजायचा की भाषणे ठोकून जयजयकाराच्या दीर्घ घोषणा द्यायच्या? दुर्दैवाने असे करणे म्हणजेच शिवरायांचे पाईक असल्याचे मानणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर या प्रकारातून शिवाजी महाराजांच्या पुण्याईचे केवळ बेगडी दर्शन आपण घडवतो. त्यासाठी मग कोणाकडून जातीचा आधार घेतला जातो, कोणी धर्माची पताका उंचावतो, तर कोणी प्रांतीय अस्मितेचा टेंभा दाखवून समाधानाचे, भावनांचे आवंढे गिळतो..!
‘युद्धावर असताना रयतेच्या शेतातील गवताच्या पात्यालाही तोशीस लावू नये’ अशी सैन्याला सक्त ताकीद देणाऱ्या शिवरायांनी सैन्य उभारताना कधीच जात, धर्म पाहिला नाही. अठरापगड जातींमधील मर्दानी मनगटे आणि निधड्या छातीचे मावळे साेबतीला घेऊन त्यांनी दिल्लीचेही तख्त हादरवून सोडले. जातीपातींच्या भिंती त्यांनी वाढू दिल्या नाहीत. तलवारीच्या जोरावर ते सहजपणे अन्य धर्मियांचे शिरकाण करू शकले असते. मात्र तसा संकुचित विचार त्यांनी केला नाही. दुर्दैवाने आजच्या घडीला शिवरायांचे होत असलेले एकांगी चित्रण आणि त्याचा वेगाने होत असलेला प्रसार पाहता, ‘शिवाजी कोण हाेता?’ हे दिवंगत गोविंद पानसरेंच्या भाषेत पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे. शिवरायांच्या नावाखाली राजकीय पटलावर जाे काही दिखाऊपणा चालला आहे, तो पाहता राजकारण्यांकडून ती अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत असताना आपण स्वत: शिवचरित्राचे नीरक्षीर विवेकबुद्धीने किती पालन करतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारून बघावा. ज्यांना शिवराय पूर्णत: ज्ञात नाहीत किंवा ज्यांच्या मनात काही कारणांमुळे गैरसमज आहेत, अशांना खरे शिवराय पटवून देण्यासाठी झटणे गरजेचे आहे. अन्यथा पुतळे कितीही उभारले, तरी त्याचा उपयोग शून्य. मनगटाच्या जोरावर शिवविचार पसरविण्याची घोडचूक करून चालणार नाही. त्यासाठी शिवनीतीचाच अंगिकार करावा लागेल. जित्याजागत्या माणसांच्या मनांतील शिवरायांविषयी संशयाचे मळभ दूर करण्यात आपण अपयशी ठरलो, तर काय उपयोग अशा वरवरच्या प्रदर्शनाचा? हाच विचार शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने गांभीर्याने करण्याची गरज आहे.