POLITICS | सैरभैर राजकारण अन् तर्क-वितर्कांच्या लाटा

चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम यांचं खास विश्लेषण
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 20, 2023 20:29 PM
views 404  views

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. उद्धव ठाकरे नवा पक्ष स्थापन करणार काय ? राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेत येणार काय ? तसे झाल्यास राज ठाकरेच पक्षप्रमुख होणार ? या आणि यासह अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या निकालाचे प्रत्येकजण कसे आपल्या परीने अर्थ काढतायत पाहूयात.


एकनाथ शिंदे यांनी बंड करून राज्यात राजकीय भूकंप घडविला. एक दोन नव्हे तर तब्बल ४० आमदारांना घेऊन त्यांनी गुवाहाटी गाठली. राज्यात परतल्यानंतर त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्या मधल्या काळात ठाकरे गटाकडून शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. तसेच न्यायालयीन लढाई देखील सुरू केली. याच धामधुमीत राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना कुणाची यावरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग येथे सुनावण्या आणि दोन्ही बाजूने कागदपत्रे सादर करण्यात आली. याच राजकीय लढाईत मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा झाला आणि ठाकरे गटाचे १२  खासदार शिंदे गटात डेरेडाखल झाले. 

एकामागोमाग एक ठाकरे गटाला धक्के बसत होते. न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरे सुरू केले. तर ठाकरे गटाची बाजू मीडियासमोर लावून धरणारे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात अटक झाली. राऊतांच्या अनुपस्थितीत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरण्यासाठी राज्यभर दौरे केले.

या सगळ्या राजकीय धुमशानात तिकडे न्यायालयात आणि निवडणूक आयोगात तारीख पे तारीख सुरू होती. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात येत होता. अशातच अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी पुन्हा कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. दोघांच्या भांडणात शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्यात आले. शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना नाव दिले, तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देऊन निवडणूक लढवली. ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले. शिंदे गटाने अंधेरी पोटनिवडणूक लढवली नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हसुद्धा वापरू दिले नाही. अखेर निवडणूक आयोगाने दोघांना तात्पुरते नाव आणि चिन्ह दिले. ठाकरे गटाने मशाल चिन्हावर निवडणूक लढवत ऋतुजा लटके यांना उमेदवारी देत त्यांना निवडून आणले.

सुनावण्या सुरूच राहिल्या. राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. शिवसेना नाव आणि चिन्ह आम्हालाच मिळणार असे शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. या सुनावण्यांची राज्यभरात चर्चा सुरू होत्या. त्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडून गेला. आणि चर्चा सुरू झाल्या त्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची. मात्र, ओबीसी आरक्षणाचा विषय कोर्टात असल्याने त्या निवडणुका सुद्धा लांबणीवर पडल्या. तोपर्यंत सुनावण्यांचा सिलसिला असाच सुरू राहिला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तळकोकणात आले. कणकवलीत त्यांची जाहीर सभा झाली. ‘इलाका तेरा धमाका मेरा’ अशी डरकाळी फोडत नारायण राणेंना इशारा दिला. 

राऊतांचा धमाका संपता संपताच कोणाच्या ध्यानिमनी नसताना अचानक गेल्या शनिवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने एक निर्णय जाहीर केला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने ठाकरे गटाला धक्का बसला अन् राज्यात राजकीय धमाका झाला. शिंदे गट आणि भाजपाने जल्लोष साजरा केला. तर ठाकरे गटात सन्नाटा पसरला होता. या निर्णया विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. चिन्ह आणि पक्षाचे नाव गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे नवा पक्ष काढतील. निवडणुका लागल्या तर पक्ष आणि चिन्ह लागेल. निवडणूक आयोगाने दिलेली मशाल चिन्ह हे तात्पुरते होते. त्यामुळे पुढील निवडणुकांसाठी नवीन पक्ष स्थापन करणार काय ? पक्षातील चाळीस आमदार शिंदेंसोबत गेले. राहिलेल्या आमदारांना एकनाथ शिंदे व्हीप बजावणार. व्हीप धुडकावल्यास त्या आमदारांवर कारवाई होऊ शकते. त्या आमदारांची आमदारकी सुद्धा धोक्यात येऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. 

राज ठाकरे होणार पक्षप्रमुख ? 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे, फडणवीस, राणे यांसह अन्य भाजपा नेत्यांनी राज ठाकरे यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यावेळी अनेकांना मुंबई महापालिका राज ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपा आणि शिंदे लढवणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात वेगळीच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्या पक्षाचे पक्षप्रमुख हे राज ठाकरे असतील. ही खुमासदार चर्चा सध्या नाक्या-नाक्यावर सुरू आहे. शिंदे यांना चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो. त्यामुळे बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेपासून दूर झालेले राज ठाकरे हे आता शिवसेनेत परतू शकतात. शिवाय बाळासाहेबांच्या विचाराचे राज ठाकरेच खरे वारसदार आहेत, असे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात होते. आगामी मुंबई, ठाण्याची महापालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. काही करून उद्धव ठाकरेंना महापालिका द्यायची नाही, असा चंग भाजपाने बांधला आहे. त्यामुळे राज ठाकरेंना घेतल्यास मराठी मते फुटणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंना सहनुभूती मिळणार नाही.  त्यात शिंदे- फडणवीस यांच्या राज ठाकरेंसोबतच्या झालेल्या चर्चांमुळे त्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. 

दै. सामनाचे काय होणार ? 

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे काय होणार ? असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. शिवाय राज्यातही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण सामना, मार्मिक साप्ताहिक, दोपहरका सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या सामनामधूनच जाहीर होत होत्या. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाच्या घरासह विरोधी पक्षांकडे सुद्धा सामना पाहायला मिळत होता. सामनाच्या अग्रलेखाचीही चर्चा होताना आरोप-प्रत्यारोप होत होते. त्यामुळे चिन्ह गेलं, शिवसेना नावंही गेलं. मग शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे काय होणार ? असा प्रश्न आणि त्याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, ही सामना प्रकाशनं प्रबोधन प्रकाशन या संस्थेची असून ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. आणि रश्मी ठाकरे यांच्याकडे त्याची मालकी आहे, अशी माहिती मिळत आहे. 


पुन्हा बंड झाल्यास ? 

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले शिवसेनेचे चाळीस आमदार फुटून जाऊ शकतात. त्यांनी बंड करून थेट पक्षावरच दावा केला. अन् झालेल्या युक्तिवादात थेट शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आता जर हे एवढे बंड होते, जर भविष्यात पुन्हा एकदा जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभी राहून अनेक आमदार, खासदार, नगरसेवक निवडून दिले, तर ते त्यांच्याशी प्रामाणिक राहतील ? किंवा ते निवडून आलेले सदस्य मग ते कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना कडक कायदे बनविणार काय ? शिवाय उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जात आहेत. न्यायालयात किती वर्षे सुनावणी होत राहणार ? सुनावणीत पुढे निर्णय काय होणार आणि उद्धव ठाकरे यांना अपेक्षित निकाल न लागल्यास त्यातून साध्य काय होणार ? अशीही चर्चा सुरू आहे. 

राजकारणात कोण कधी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. त्यामुळे आता झालेली ही राज्यातील सर्वात मोठी घडामोड होती. यावरून अनेक चर्चा आणि मीम्स सुरू होत्या आणि आहेत. यापुढील घडणाऱ्या घटनांवरूनही त्या होत राहतील. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या घडामोडी, झालेले निर्णय, कोर्टात आणि निवडणूक आयोगात झालेल्या सुनावण्या, चाललेला युक्तिवाद, इथपर्यंतचा आणि इथून पुढच्या राजकीय घडामोडी, कोर्टफेऱ्या, युक्तिवाद, दावे- प्रतिदावे आणि निकाल यांच्या चर्चा आणि मीम्स होत राहतील. झालेल्या या सर्व राजकीय गोटातील चर्चा आहेत. भविष्यात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.