OXYGEN TOURISUM | 'हा' धबधबा म्हणजे फेसळत कोसळणारे पाणी अन् शुद्ध ऑक्सिजन !

सिंधुदुर्गातला एकमेव बारमाही वाहणारा धबधबा !
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 31, 2023 16:45 PM
views 494  views

वैभववाडी : शेकडो फुटावरून कोसळत असलेले फेसाळणारे पाणी, त्यातुन निघारे तुषार, खोल डोह, वृक्षांची दाटी, पक्षांचा किलबिलाट आणि पर्यटकांना मजेदार अंघोळीचा आनंद घेता येईल, असा मुख्य धबधब्याच्या माथ्यावर असलेला लहान धबधबा असे चित्र बारमाही पाहायला मिळणारा धबधबा म्हणुन वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याची ओळख आहे. बारमाही वाहणारा जिल्हयातील एकमेव धबधबा आहे. फेसळत कोसळणारे पाणी आणि हिरवागार निसर्ग यामुळ भरपूर शुद्ध ऑक्सिजन देणाऱ्या पर्यटन स्थळांमध्ये नापणे धबधब्याचा समावेश होतो. 


कोकणात पावसाळी वाहणारे असे शेकडो धबधबे पाहायला मिळतात. जिल्हयातील आंबोलीतील धबधब्याची लोकप्रियता तर देशभर आहे. धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील अर्थकारणाला मोठा हातभार लागतो. अशा प्रकारे सावडाव, नांगरतास, मुटाट, मणचे, मांगेली, असनिये, करूळ घाट, भुईबावडा घाट, फोंडाघाट याठिकाणी निसर्गाचा अद्‌भुत देखावे धबधब्याच्या रूपाने पाहायला मिळतात. परंतु जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानतंर हे धबधबे कोसळायला सुरूवात होते. त्यानतंर सप्टेंबर अखेर पावसाचे प्रमाण कमी व्हायला जशीजशी सुरूवात होते, तसतसे धबधबे कोसळायचे प्रमाणही कमी होते. परंतु याला वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा मात्र अपवाद आहे.

वैभववाडी आणि तळेरे शहरांपासुन १४ ते १५ किलोमीटर अतंरावर तर तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गापासुन सात किलोमीटर अंतरावर बारमाही वाहणारा वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा आहे. सभोवताली गर्द झाडी, त्या झाडीमधुन शेकडो फुट कड्यावरून कोसळणारे पाणी, या फेसाळणाऱ्या पाण्यातुन उडणारे दवबिंदु झेलताना एका आगळ्या वेगळ्या पर्यटनाचा आंनद या ठिकाणी पर्यटकांना घेता येतो. मुख्य धबधबा कोसळतो त्याठिकाणी आता ४० खोलीचा डोह तयार झाला आहे. या डोहात पर्यटकांना आघोंळ करण्यास मनाई आहे. परंतु मुख्य धबधब्यांच्या माथ्यावर कमी उंचीवरून कोसळणारे दोन ठिकाणे आहेत. तेथेच चार पाच फुट उंचीचा डोह देखील आहे. येथे निर्धास्त आणि सुरक्षितपणे पर्यटकांना आघोंळीचा आस्वाद घेता येतो. मुख्य धबधब्याच्या पायथ्याशी उतरल्यानतंर कोसळणाऱ्या पाण्याचे दवबिंदु थेट पर्यटकांना अंगावर घेता येते.या परिसरात कित्येक दुर्मिळ पक्षी असुन त्यांची किलबिलाट सतत सुरू असते. त्याचप्रमाणे इथला भरपूर शुद्ध ऑक्सिजन पर्यटकांना निश्चितच रीफ्रेश करेल.    


नापणे धबधबा बारमाही वाहत असल्यामुळे पावसाळ्यापेक्षा उन्हळ्यात या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते.सिंधुदुर्ग जिल्हयालगतच्या कोल्हापुर जिल्हयातील मोठ्या प्रमाणात पर्यटक या धबधब्यावर येत असतात.याशिवाय पुणे,मुंबई,गुजरात,राजस्थान,पंजाब,सातारा,सांगली, यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील पर्यटक नापणे धबधब्यावर येतात.


नापणे धबधब्याला येणाऱ्या पाण्याचा उगम हा नाधवडे येथील श्री.महादेव मंदीरासमोर असलेल्या उमाळ्यावरून झाला आहे.उमाळा हे देखील प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे,याच उमाळ्याचे पाणी पुढे वाहत जावुन नापणे धबधब्याला जाते.गेल्या काही वर्षात नापणे धबधब्याची ख्याती सर्वदुर पसरली असुन आता या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.मुंबई-पुणे-कोल्हापुर-सिंधुदुर्ग या मार्गे येणारे पर्यटक नापणे धबधबा पाहुन जिल्हयातील इतर पर्यटन स्थळांकडे मार्गस्थ होऊ शकतात.