कभी हार न मानने की
आदत ही सबसे बडी
जीत दिलाती है
होय, हेच शब्द आपल्या व्यक्तीमत्वातुन सिध्द करणारं अलौकीक लोकनेतृत्व.. बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यानंतर आपल्या झंझावाती कार्यशैलीनं अवघ्या जगभरात कोकणची ओळख बनलेलं हे दूरगामी नेतृत्व... केवळ भाषणात नव्हे तर आपल्या कामातून बोलणारं आणि कोकणच्या विकासाचं व्हिजन केवळ स्वप्नात न ठेवता प्रत्यक्षात साकारणारं हे किमयागार व्यक्तिमत्व... सरकारमध्ये राजकीय दबदबा आणि प्रशासनावर पकड असणारं हे दबंग नेतृत्व. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार समर्थपणे सांभाळणारं आणि याच माध्यमातून कोकणचा कायापालट करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारं जाणतं नेतृत्व... आदरणीय केंद्रीय मंत्री नारायण राणे...
सध्या जितका वाटतो तितका राजकारण हा साधा आणि सोपा विषय नाही. प्रचंड कष्ट करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी, अभ्यास आणि मुत्सद्दीपणा यातूनच खरा राजकारणी घडतो. या सर्वांइतकाच पाठीवरचा हातही महत्त्वाचा. आदरणीय दादांना सुरुवातीच्या काळात हा पाठीवरचा हात लाभला तो आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. त्यावेळच्या कॉंग्रेसी राजकारणाच्या अनेक प्रचलित प्रथा, परंपरा भेदून आदरणीय दादांनी आपलं भक्कम स्थान निर्माण केलं.
याच यशस्वी वाटचालीचा मानबिंदू ठरलं ते त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद. अवघ्या कोकणसाठी हा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा काळ ठरला. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीतही आदरणीय दादांनी आपल्या वेगळ्या कार्यशैलीची मोहोर उमटवली. धडाडीने निर्णय घेतले आणि तितक्याच वेगाने ते प्रत्यक्षात आणले. आपल्या कामातूनच त्यांनी आपली निवड कशी सार्थ आहे, हे दाखवून दिलं. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासातही नेहमीच अन्याय झालेल्या कोकणवासीयांसाठी आदरणीय दादांच्या रूपानं एक आधुनिक भगिरथ मिळाला. कोकणच्या विकासाचं एक वेगळं व्हीजन असणाऱ्या दादांनी विकासाचा आराखडा तयार केला आणि कामाला प्रारंभही केला. हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं, कारण वर्षानुवर्षे कोकणातले प्रश्न कायम होते. निसर्गाचं भरभरून वरदान लाभलं असतानाही कोकण पर्यटनात नजीकच्या गोव्यापेक्षा मागं होतं. बेरोजगारांचा लोंढा मुंबईला जातच होता. मुंबईकरांच्या मनिऑर्डरवर गुजराण चालायची. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांचा तर कायमचा दुष्काळ. हे परिवर्तन घडवायचं तर त्यासाठी आदरणीय दादांसारखाच धडाडीचा नेता हवा. आणि हे त्यांनी सिध्दही करून दाखवलं. केवळ निधींच्या घोषणा करून आणि टेंडर काढून विकास कधीच होत नसतो. त्यासाठी एक दिशा आणि भूमिका निश्चित करून वाटचाल करायची असते. समोर येणाऱ्या संकटांना आडवं करण्याची धमक ठेवायची असते. प्रशासनावर मजबूत पकड ठेवायची असते. आणि हे करीत असतानाच राजकीय हितसंबंधही तितक्याच प्रगल्भतेनं टिकवायचे असतात. आदरणीय दादांनी अगदी सुरुवातीपासून आपल्या राजकारणाची ही दिशा निश्चित केल्यामुळे त्यांचा फायदा अवघ्या कोकणला झाला.
कोकण रेल्वेनंतर अगदी अल्पावधितच अनेक मोठे प्रकल्प कोकणात आले. सिंधुदुर्ग हा स्वतंत्र जिल्हा बनला. इतकेच नव्हे तर देशातला पहिला पर्यटन जिल्हा होण्याचा बहुमानही या जिल्ह्याला मिळाला. इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात मोठी वाढही झाली. कोकणातल्या या झपाट्यानं झालेल्या परिवर्तनामुळे एक सत्य सूर्यप्रकाशाइतकं लख्खपणे समोर आलं की, विकासाचा बॅकलॉग भरून काढत कोकणला समृध्द करायचं असेल, तर त्यासाठी आदरणीय दादांसारखंच खमकं नेतृत्व हवं. संतांनी म्हटलंय, येरा-गबाळयाचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे !
म्हणूनच राजकारणातली ही राणे स्टाईल आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि तितकीच दिल्ली दरबारीही फेमस आहे.
आदरणीय दादांच्या या संपूर्ण वाटचालीमधलं एक सर्वांत मोठं वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे स्वतःच्या हिमतीवर कायापालट करण्याची त्यांची धमक. कोकणावर कोणतेही संकट येवो, हम खडे तो सरकारसे बडे... असं म्हणत ते असे काही त्या संकटाला भिडतात, की परत येताना ते संकटही दहावेळा विचार करेल. नैसर्गिक आपत्ती असो, शेतकरी बांधवांचे, मच्छिमारांचे प्रश्न असोत, आदरणीय दादांनी प्रत्येकवेळी त्याचा आपल्या पध्दतीनं प्रभावीपणे निकाल लावला. प्रशासनातले जाणकार अधिकारी दादांच्या या अनोख्या शैलीबाबत आजही आदराने बोलताना दिसतात. आणि एखाद्या राजकीय नेतृत्वाची ही मोठी कमाई असते.
विकासाचं व्हिजन नसेल, तर राजकारणातला तुमचा प्रवास हा चाकं नसलेल्या गाडीसारखाच असतो. आदरणीय दादांनी मात्र राजकारणात एकच व्हिजन ठेवलं, ते म्हणजे कोकणला जगाच्या नकाशावर झळकवण्याचं. कोकणचा कायापालट करायचा, कोकणवासीयांना समृध्दीचे दिवस दाखवायचे आणि हे करीत असताना जे काही करायचं ते भव्य दिव्यच करायचं. याच भूमिकेतून भव्य दिव्य असं विमानतळ, सी-वर्ल्ड प्रकल्प असे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे प्रकल्प पुढं आले. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी कोकण गोव्यावर अवलंबून आहे. परंतु यासाठी सरकारची वाट न पाहता, ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रयत्नांतून पडवे येथे लाईफ टाईम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारले. हे आरोग्यतीर्थ आज अत्याधुनिक वैद्यकीय सेवेबरोबरच कोकणातील मुलामुलींना डॉक्टर बनवण्यासाठी कार्यरत आहे. हे आरोग्यतीर्थ उभारल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच प्रतिक्रिया आली, ती म्हणजे, हे फक्त राणेच करू शकतात.
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा,
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे
अशीच वाटचाल करीत आदरणीय दादांच्या आजवरच्या तपश्चर्येचं हे फलित आहे. कर्तबगार आणि धडाडीच्या नेतृत्वाला कोणाच्या शिफारशीची गरज नसते, कारण कोकणवासीयांनी अगदी सुरुवातीपासूनच आपल्या काळजात जपलेलं हे नेतृत्व आहे. म्हणूनच कोकणच्या प्रगती एक्सप्रेसला कोणतं इंजिन जोडायचं, याचा अचूक निर्णय घेत पंतप्रधान मोदी यांनी आदरणीय दादांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. भाजपसारख्या सर्वात मोठ्या पक्षाचं केंद्रीय मंत्रीपद कोकणला मिळणं, ही आदरणीय दादांच्या माध्यमातून कोकणवासीयांना थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडून कोकणवासीयांना मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. मुळातच स्वकर्तृत्वावर भक्कमपणे उभा असणाऱ्या या नेतृत्वाला केंद्राची ताकद मिळाल्यावर आता कोकणचा विकासही डबल इंजिन विकास होतोय, याची प्रचिती आपण सर्वच जण घेतोय. भव्य अशा रोजगार मेळाव्यातुन याची प्रचिती आपणा सर्वांना आलीच आहे.
असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
आदरणीय दादांसारख्या दमदार नेतृत्वामुळं निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला नवा कोकण पाहायला मिळेल. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी अतिशय तळमळीनं आणि अखंडीत काम करणाऱ्या आदरणीय दादांना पुढील वाटचालीसाठी आणि वाढदिवसानिमित्त कोकणसाद लाईव्ह टीमच्या हृदयापासून शुभेच्छा.....!