सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आता पर्यटकांसाठी धावणार 'मिनी ट्रेन'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मोठी घोषणा !
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 26, 2022 18:45 PM
views 278  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारपटीच्या मार्गाने पर्यटकाना फिरवून आणणारी मिनी ट्रेन सुरु करण्याबाबचा विचार असून, त्याबाबतचा आराखडा व अंदाजपत्रक  येत्या तीन महिन्याच्या आत तयार करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी व रेल्वे सह अन्य वरिष्ठ अधिकार्‍याच्या उपस्थितीतील बैठकीत दिले.

राजधानी एक्सप्रेसला सिंधुदुर्गात कुडाळ येथे थांबा देण्याची सूचना याच बैठकीत केली. तर पर्यटन विकास डोळ्यासमोर ठेऊन रस्ते नवीन ब्रिज, पाणी पुरवठा, कृषी विकास तिलारी चा पर्यटक दृष्या वापर करुन अधिकार्‍यांनी जिल्हावासियांसाठी काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्यात.

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी सभागृहात ही महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत केंदिय मंत्री नारायण राणे यांनी सर्वच विभागांचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, अधिक्षक सौरभकुमार अगरवाल, कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यव्यस्थापकीय संचालक संजय गुप्ता, कोकण रेल्वेचे सहा.व्यव्यस्थापकीय संचालक गिरिष करंदीकर,माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष र‍ाजन तेली, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप थोरात,अधीक्षक अभियंता विजय थोरात,बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नाईक,कार्यकारी अभियंता सर्वगोड,अनामिका जाधव,कृषी अधीक्षक दिवेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांसह अनेक विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 सिंधुदुर्ग  जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. म्हणूनच या जिल्ह्यात सागरी किनारपट्टीवरून फिरणारी एक मिनी ट्रेन, त्याचा मार्ग, त्यासाठी लागणारी जमीन, याबाबतचा एक आराखडा येत्या तीन महिन्याच्या आत जिल्हाधिकारी तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांनी एकत्र बसून तयार करावा. जिल्ह्यातील नांदगाव ते देवगड पुढे वेंगुर्ला नंतर सावंतवाडी पुन्हा कुडाळ कणकवली व परत नांदगाव अशी मिनी ट्रेन सुरू करून पर्यटकांना पर्यटक सुविधा देण्यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना तयार करावी. याबाबत आपली केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चाही झाली आहे असेही राणे साहेब यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शहरांना जोडणारी व पर्यटन ठिकाणे व दर्‍या खोर्‍यांसह सागरी निसर्गरम्य परिसराची ठिकाने  दाखविणारी ही मिनी ट्रेन व त्याचा मार्ग याबाबतचा अंदाजित खर्चाचा आराखडा येत्या तीन महिन्यात तयार व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी या बैठकीत व्यक्त केली.

     

 तिलारीचा पर्यटन दृष्टया विकास

तिलारी प्रकल्पाचे पाणी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. तसेच या पाण्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवायला हवी त्यासाठी तिलारी परिसरात रिंग रोडची सुविधा करण्यात यावी, जेणेकरून आलेले पर्यटक या तिलारी प्रकल्पाच्या व आजूबाजूच्या जंगलमय निसर्गरम्यतेचा व जलाशयातील पाण्याचा आनंद लुटू शकतील व त्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना अशा परिसरात राबवाव्यात. सावंतवाडी नरेंद्र डोंगरावर रोप वे चा प्रस्तावही तयार करावा अशाही सूचना नारायण राणे यांनी केल्या.  

      

रखडलेले पाटबंधारे प्रकल्प सुरु करु.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो 450 टीएमसी पाणी समुद्राला जाऊन मिळते व सध्या 50 टी एम टी पाण्याची आपण पाटबंधारे प्रकल्पात साठवणूक करत आहोत. मात्र हे प्रमाण वाढवण्यासाठी टाळंबा व सरंबळे हे दोन मध्यम प्रकल्प पूर्णत्वाकडे जायला हवेत. यासाठी अधिकाऱ्यांनी या दोन्ही पाटबंधारे प्रकल्पांच्या फाईल ओपन  कराव्यात अशाही सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. तिलारी प्रकल्पाचे पाणी मालवणपर्यंत पोचविण्यासाठी जी योजना हाती घेतली होती त्याला गती द्यावी तसेच पाटबंधारे प्रकल्पात साठलेले पाणी शेतकरी बागायतदार यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढाकार घ्यावा अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या

       

अधिकारी हा शासनाचा थिंक टँक


सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन हे वरदान असून पर्यटनाचा वापर जिल्ह्याच्या विकासासाठी झाला पाहिजे म्हणूनच या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. अधिकारी वर्ग हा थिंक टॅंक असून पर्यटनाच्या दृष्टीने नाविन्य उपक्रमात त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. नाविन्यपूर्ण योजना सुचवायला हव्यात अशाही सूचना नारायण राणे यांनी या बैठकीत दिल्या.

     

भातशेतीला पुरक शेती हवी


जिल्ह्यातील भात शेती किफायतशिर होत  नाही म्हणूनच भात शेतीला पर्यायी व पूरक शेती करता येईल का याचा विचार होणे आवश्यक आहे. कृषी विभागाने त्याची दखल घेऊन तशी शेती करण्याबाबतचे नियोजन करावे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून भात शेती बरोबरच पूरक शेती होईल व भात शेती पूरक उत्पादने शेतकऱ्यांना घेता येतील.


रस्त्याबाबत नाराजी


 जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था असून बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जेदार कामे होत नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले अशा ठेकेदारांवर कारवाई करा व रस्त्यांची दर्जेदार कामे करा असेही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले. आपल्या नजीकचा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच चीपी येथील विमानतळ व जिल्ह्यातील पर्यटन स्थळे यांना जोडणारे रस्ते दर्जेदार असावेत पर्यटकांसाठी काही सुविधा असाव्यात त्या दृष्टीने बांधकाम विभागाने रस्ते ब्रिज अशी कामे प्राधान्य क्रमाने हाती घ्यावी असेही नारायण राणे यांनी सुचित केले.

      

 सिंधुदुर्गनगरी सुशोभीत करा.


सिंधुदुर्गनगरी हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून येथील सुशोभीकरण तातडीने हात घ्यावेत.जिल्हाधिकारी भवन व प्रशासकीय संकुलाचा परिसर त्वरित स्वच्छ करावा याकडेही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सिंधू नगरी प्राधिकरणासाठी देखभाल दुरुस्तीसाठी सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र त्यातील फक्त आठ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे हा निधी मिळाल्यास ही कामे तातडीने पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली.राजधानी एक्सप्रेस ला थांबा तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी रेल्वेमध्ये जागा या महत्त्वाच्या विषयाकडे ही के.मंजूलक्ष्मी याने त्यांचे लक्ष वेधले होते