उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने कुणकेरीच्या सुपुत्राचा सन्मान !

डॉ. रमेश लक्ष्मण कुणकेरकर यांचे भात, नाचणी, वरी, भुईमूग या पिकांमध्ये उल्लेखनीय संशोधन
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 15, 2022 18:34 PM
views 225  views

सावंतवाडी : अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून कृषी संशोधक पदापर्यंत पोहोचलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचे सुपुत्र, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे गेली २८ वर्षे कार्यरत असलेले कृषी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश लक्ष्मण कुणकेरकर यांनी केलेल्या भरीव संशोधनात्मक कार्याबदल त्यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२२ चा उद्घाटन समारंभ कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी दापोली येथे झाला. यावेळी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उत्कृष्ट कृषी संशोधन केलेल्या संशोधकांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. रमेश कुणकेरकर यांचा समावेश होता.

यावेळी कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रति उपकुलपती अब्दुल सत्तार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव (कृषी) एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, तसेच चारही विद्यापीठांचे संशोधन, शिक्षण, विस्तार संचालक उपस्थित होते. 

यावेळी चारही कृषी विद्यापीठांमध्ये उत्कृष्ट कृषी संशोधन केलेल्या संशोधकांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले कृषी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश लक्ष्मण कुणकेरकर यांनी केलेल्या भरीव संशोधनात्मक कार्याबदल त्यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुणकेरकर हे २८ वर्षे विद्यापीठांच्या अविरत सेवेत असून त्यांनी भात पीक, नाचणी, वरी, भुईमूग या पिकांमध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य केले आहे. विविध पिकांच्या विविध गुण वैशिष्ट्ये असलेल्या १५ सुधारित आणि संकरीत जाती प्रसारित करून पी.पी.व्ही. एफ. आर. ए.कडे नोंदणी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच संकरित व सुधारित भात बिजोत्पादन घेण्याकरिता शेतकरी महाबीज, खासगी कंपन्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पदव्युत्तर ५ विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे.  


विविध लेख, उपक्रम

- विविध शास्त्रीय संस्थांचे आजीव सदस्य.

- ३ पुस्तके आणि विविध पुस्तकांमधील अध्यायांचे लेखन. 

- ४३ शास्त्रीय संशोधनपर लेख, ९८ तांत्रिक लेख 

- ३६ विविध नियतकालिकांमध्ये संशोधन लेख 

- ९ दूरदर्शन आणि ३६ आकाशवाणी कार्यक्रमांतून शेतकरी कृषी विस्तारक यांना मार्गदर्शन 

- आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय ८ प्रकल्पांचे मुख्य व उप समन्वयक म्हणून कार्य 


विविध पुरस्कार

- कै. मुकुंद दांडेकर आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार 

- कै. वसंतराव नाईक प्रेरणा पुरस्कार, 

- उत्कृष्ट संशोधन लेख, उत्कृष्ट भित्ती पत्रिका 

- सर्वोत्कृष्ट तांत्रिक लेख पुनरावलोकन आदी पुरस्कार प्राप्त 

- उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार - २०२२.