कोकणवासीयांची हक्काची 'ताई ' !

सौ. अर्चना घारे-परब वाढदिवस विशेष
Edited by: विनायक गांवस
Published on: November 30, 2022 14:50 PM
views 250  views

सौ. अर्चनाताई घारे-परब, कोकणवासियांसह जनसामान्यांसाठी झटणारी 'कोकण कन्या' ! समाजकारण, राजकारण, सहकार, उद्योग व व्यवसाय, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळविणार हे व्यक्तिमत्त्व. विद्येच माहेरघर असणाऱ्या पुण्यात कोकणची हुशारी सिद्ध करून दाखविणाऱ्या अर्चनाताईंचा मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ ग्रामपंचायत सरपंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा असा प्रवास थक्क करणारा तर आहेच. परंतु, राजकारणात येवू पाहणाऱ्या महिलांसाठी आदर्शवत असा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाटचालीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. 


ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राष्ट्रवादी 'युवती काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदापर्यंत भरारी घेणाऱ्या अर्चनाताई या पेशाने सिव्हील इंजिनिअर आहेत. ज्या महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी झटत आहेत. त्यांच मूळ हे आपल्या तळकोकणातील आहे. त्यामुळे चिकाटी अन् ध्यास त्यांच्या रक्तात आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात असणार भालावल हे त्यांचं मूळ गाव‌. चार भावंडांत त्या ज्येष्ठ, त्यांचे वडील कै. यशवंतराव व्यावसायिक, तर आई प्रिया या गृहिणीची जबाबदारी पार पाडून व्यवसायात मदत करीत. महिला सक्षमीकरणाचं बाळकडू हे त्यांना  त्यांच्या आईनंच पाजलं. सावंतवाडी शहरात त्यांचा स्टेशनरी, जनरल, कॉस्मेटिक वस्तूंचा होलसेलचा व्यवसाय होता. गावात काजू, सुपारी आणि फणसाची शेतीही होती. सर्वसामान्य कुटुंबात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. यशाची शिखर पादाक्रांत केल्यानंतर आजही तो साधेपणा त्यांनी जपला आहे.


सावंतवाडीच्या मिलाग्रीस हायस्कुलमधून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी घेतलं. नेहमी वेगळ काही तरी करावं हा विचार त्यांच्या मनात असायचा. म्हणूनच सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनात सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. पुण्यात सीओईपीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संदीप घारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. इंजिनिअरिंगचा अनुभव यावा, म्हणून काही दिवस पुणे येथे एका खासगी कंपनीत त्यांनी कामही केले. त्यानंतर संदीपजींनी त्यांना स्वतः व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सिव्हील इंजिनिअरिंग हे क्षेत्र सर्वसाधारणपणे पुरुषप्रधान मानले जायच, त्यामुळे ताईंच्या  दृष्टीने हे क्षेत्र एक नवीन आव्हानच होत. हे आव्हान स्वीकारत त्यांनी मावळ परिसरात छोटे-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. नवनिर्मित करणे हा ध्यास असल्यानं 'अर्चना क्रिएशन'च्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण गृहप्रकल्पाची निर्मिती करण्याचे काम त्यांनी सुरू केले. कोकणात देखील अर्चना क्रिएशनच्या माध्यमातून त्यांनी याची मुहुर्तमेढ रोवलीय‌‌. 


२००८ मध्ये बेबड ओहळ ग्रृप ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. कुटुंबातील तसेच जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे निवडणुक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या शिक्षणाचा, स्थापत्यशास्त्राचा गावाला समाजाला फायदा होईल, नव काही शिकता येईल म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कोणताही अनुभव नसताना निवडणूक लढवली आणि सर्वाधिक मतांनी त्या निवडूनही आल्या. चार वर्षे त्यांनी सरपंच पदाचा कारभार पाहिला. गावच्या विकासासाठी त्यांनी या काळात हातभार लावला. समाजकारण आणि राजकारण करीत असताना त्यांचे पती संदीप घारे यांनी मार्गदर्शन आणि मदत केली. त्यांच्यामुळे एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते तसंच यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो हे सिद्ध झालं. गावात महिलांची ग्रामसभा होत नव्हती, ती आयोजित करण्यासाठी ताईंनी सुरुवात केली. ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे जाणीवपूर्वक लोकसहभागाबरोबरच गावच उत्पन्नदेखील वाढले होते. त्यांच्या कार्यकाळात गावाला पर्यावरण समृद्ध ग्राम, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव असे पुरस्कार मिळविण्यात यश आले. 


त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत पंचायत राज अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकनियुक्त महिला प्रतिनिधी संघाच्या राज्य कार्यकारिणीवर त्यांची निवड करण्यात आली. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अठरा ते पस्तीस वयोगटातील युवतींसाठीचे देशातील पहिले राजकीय व्यासपीठ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची स्थापना केली. यावेळी सुप्रियाताईंबरोबर काम करण्याची संधी अर्चनाताईंना मिळाली. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या त्या प्रमुख झाल्या. युवतींवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला, आंदोलन केली. युवतींसाठी प्रबोधनाचे प्रशिक्षणाचे स्वसंरक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले.


याचदरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली. सहकारात देखील सर्वाधिक मतांनी ताई निवडून आल्या. महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री तथा विरोध पक्षनेते अजितदादा पवार यांनी पीडीसीसी बँकेच्या वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली. पहिल्यांदा एखाद्या युवतीला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी यामुळे मिळाली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखविला. नेत्यांनी दाखवलेला  विश्वास ताईंनी सार्थ करून दाखवला. या संधीच सोन करत ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करून त्यांना बँकेच्या माध्यमातून व्यवसायनिर्मितीसाठी मदत केली. महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी महिलांचे मेळावे आयोजित केले.


शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताईंच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्चनाताईंवर पक्षानं २०१८ ला  सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. यावेळी जिल्ह्यात नंबर एकचा असणारा पक्ष संपुष्टात आला होता. मंत्री, आमदार अशी पद ज्या राष्ट्रवादीनं या मातीत भुषविली तिथं राष्ट्रवादी औषधाला देखील शिल्लक नव्हती. हाताच्या बोटावर मोजता येतील न येतील एवढे कार्यकर्ते अन् संघटना जिल्ह्यात नावापूरती शिल्लक राहिली होती. संपलेला पक्ष म्हणून विरोधकांकडून हिणवलं जात होतं. राष्ट्रवादीच्या जीवावर मोठे झालेले नेते जिल्ह्यातील पक्ष संघटना संपविण्यासाठी प्रयत्नशील होते. अशा परिस्थितीत कोकणकन्या अर्चना घारेंवर पक्षानं विश्वास टाकला अन् संपलेल्या पक्षाला पुन्हा उभारी मिळाली. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामास सुरुवात केली. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. अतिवृष्टी, पुरप्रसंगासह जनतेच्या सुखदुःखात त्या सामील झाल्या. जनतेला धीर दिला. वाडीवस्ती पिंजून काढत पक्ष संघटना वाढवली. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधली. ''राष्ट्रवादी पुन्हा'' असा नारा देत संपलेल्या राष्ट्रवादीला उभारी दिली. यामुळे सावंतवाडी मतदारसंघासह कुडाळ, कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांत देखिल नवचैतन्य निर्माण झाल. याचीच दखल घेत राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. याचच फळ म्हणजे, निवडणुकांत राष्ट्रवादी उभी राहिली. यामुळे विरोधकांच्या काळजातली टिकटिक वाढू लागली. पहिल्याच प्रयत्नात काही ठिकाणी यश मिळविण्यात त्यांना यश आलं. तर काही जागा अगदी थोड्या फरकानं हातून गेल्या. मिळालेल यश हे छोट होत. परंतु, बलाढ्य पक्ष अन् नेत्यांसमोर दिलेली ही लढत देखील थोडकी नव्हती. त्यांच्या कार्यामुळे सावंतवाडी विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. उमेदवारी अर्ज देखील त्यांनी दाखल केला. परंतु, पक्षादेश मानत उमेदवारी मागे घेत पक्षानं दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला त्या लागल्या. पण, यात पक्षाचा निभाव लागला नाही. पक्षाला आलेल्या अपयशानं मागे न हटता ताईंनी पुन्हा कामाला सुरुवात केली. निष्ठेनं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले. यातच ताईंना उमेदवारी नाकारून चूक केली याची जाणीव पक्ष नेतृत्वालाही झाली. सावंतवाडीतील जाहीर सभेत त्यांनी ती बोलूनही दाखवली. २०२४ साठी कामाला लागा असे आदेश देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी देखील ताईंना आशीर्वाद दिले. जनतेत जात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यास सुरुवात केली. सुप्रीयाताईंच्या संकल्पनेतून श्री यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र सावंतवाडीत सुरू केलं. याच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून त्या कार्यरत आहेत. तर कोकण विभाग महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली असून सिंधुदुर्गसह कोकण विभागात त्या राष्ट्रवादीचे विचार त्या पोहचवत आहेत. 


जीवनात पहिले आदर्श माझे आई-वडील आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे या 'आयडॉल' आहेत. यशाचे श्रेय पती संदीप घारे आणि कुटुंबीयांना जाते. त्यांच्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत पोचले आहे. माझी फार मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. पण राजकारण, समाजकारण, सहकारात काम करीत असताना मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग प्रामुख्यानं महिलांसाठी करायचा आहे. समाज शिक्षित होत असला, तरी महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. कौंटुबिक अत्याचाराच्या घटनाना महिला बळी पडतच आहेत, याची मनाला खूप खंत वाटते. महिलांचे सक्षमीकरण होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. समाजकारण, राजकारण, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कामाचा ठसा उमटवायचा आहे असं त्या आवर्जून सांगतात.


पुण्याच्या सुनबाई अन कोकणच्या कन्या असणाऱ्या अर्चनाताईंनी पुण्यामध्ये अलिशान असं रूचकर मालवणी पद्धतीच हॉटेल सुरू केलं आहे. यामुळे मुंबई-पुण्यातील कोकणी माणसाला घरची चव चाखता येत आहे. पुण्यात कोकणची ओळख दशावतार कलेला प्रोत्साहन देत त्यांनी कोकणी बाणा जपला आहे. अशा या 'कोकण कन्येन' महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात कोकणवासीयांच नेतृत्व करावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनसेवेचा ध्यास अन् राष्ट्रवादी विचारांच्या कोकणवासीयांच्या हक्काच्या अर्चना ताईंना टीम कोकणसादच्या वाढदिनी हार्दिक शुभेच्छा.