धक्कादायक बातमी | 134 मृत्यूंचा तपास 25 मिनिटांत पूर्ण

पुलाद्वारे पैसे कमावणारी कंपनी, नूतनीकरण करणारे कंत्राटदार व सरकारी अभियंत्यांचे एफआयआरमध्ये नावच नाही
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 01, 2022 08:38 AM
views 306  views

मोरबी : गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता केबल पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या १३४ वर गेली आहे. यामध्ये ५० पेक्षा अधिक मुलांचा समावेश आहे. राजकोटचे भाजप खासदार मोहनभाई कुंडारिया यांचे 12 नातेवाइकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या 191 आहे.

मृतांच्या आकडेवारीत वाढ होत असताना इकडे या भीषण दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बड्या धेंडांना वाचवण्याचा खेळही सुरु झाले आहेत. याप्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्यामध्ये (एफआयआर) पूल ऑपरेट करून पैसे कमावणारी ओरेवा ग्रुपचा उल्लेख नाही. एवढेच नव्हे तर नूतनीकरणाचे काम करणारी ठेकेदार कंपनी देवप्रकाश सोल्यूशन, ज्यांच्यावर देखभाल करण्याची जबाबदारी होती ते नगरपालिकेचे अभियंते यांचेही नाव एफआयआरमध्ये नाही. सोमवारी पोलिसांनी ९ जणांना अटक केली. यामध्ये ओरेवाचे दोन व्यवस्थापक, दुरूस्ती करणारे दोन कामगार, ३ सुरक्षा रक्षक आणि तिकीट विक्री करणारे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. राज्य सरकारने चौकशीसाठी नेमलेल्या ५ अधिकाऱ्यांच्या समितीने केवळ २५ मिनिटात चौकशीचे काम आटोपले. दरम्यान, गुजरात सरकारने २ नोव्हेंबर रोजी राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. मोरबी दुर्घटनेमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा १-२ नोव्हेंबर ऐवजी दोन दिवस उशिरा होऊ शकते.

 पूल संचालक कंपनी ओरेवाने कमाईच्या लालसेने मंजुरी न घेताच पूल खुला केला. तिकिटांचे दर १५ रुपयांवरून १७ रुपये केले. पाच दिवसांत १०-१२ हजार लोक आले.

ना फिटनेस टेस्ट झाली, ना लोड टेस्टिंग. तरीही १०० लोकांची मर्यादा असताना ३ पटींपेक्षा जास्त लोकांना पुलावर पाठवले.

नगरपालिकेला आपल्या अभियंत्यांकडून फिटनेस टेस्ट करायची होती. मात्र, ५ दिवस चौकशी न करताच पूल खुला ठेवला. कुणाच्या आदेशाने मौन बाळगले?

पालिकेचे मुख्याधिकारी संदीप सिंह झाला म्हणाले, कंपनीने नियमांविरुद्ध पूल खुला केला. परवानगीही घेतली नाही.

 मुख्यमंत्री-गृहमंत्री दोघे घटनास्थळावर आहेत. असे असूनही ओरेवा, देवप्रकाश सोल्युशन व सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यात आले. एफआयआरमध्ये त्यांची नावेदेखील नाहीत.

मोरबी घटना तांत्रिकदृष्ट्या अत्यंत निष्काळजीपणाचा परिणाम आहे. २ कोटींतून पुलाची दुरुस्ती केली, पण पुलाचा भार उचलणारा महत्त्वाचा भाग ‘अँकर-पिन’ मजबूत केली नाही. यामुळे दरबारगडच्या बाजूने लागलेली अँँकर-पिन उखडली व घटना घडली. अँकर-पिनचा आधार झुलत्या पूलाच्या दोन्ही बाजूने असतो. मोरबी पुलाच्या अँकर-पिनची क्षमता १२५ व्यक्तींची आहे. मात्र, रविवारी ३५० पेक्षा अधिक लोकांना प्रवेश देण्यात आला.