
मुंबई : समुद्रमार्गे अंमली पदार्थ तस्करीची प्रकरणे वाढती असल्याने, ही सर्व तस्करी अरबी समुद्राच्या अधिकाधिक पश्चिमेकडे ठेवण्यासाठी मुंबईत मुख्यालय असलेल्या नौदलाच्या पश्चिम कमांडने कंबर कसली आहे. राष्ट्रीय समुद्री सुरक्षा समन्वयातून संयुक्त मोहिमांद्वारे या संकटाचा सामना केला जात आहे. आज, ४ डिसेंबर या नौदल दिनाच्या निमित्ताने हा विषय महत्त्वाचा ठरतो.
भारतात होणारी अमली पदार्थ तस्करी याआधी प्रामुख्याने दक्षिण अमेरिका ते आफ्रिकामार्गे येत होती. पण आता हा मार्ग अफगाणिस्तानहून झाला आहे. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तान सोडून गेल्यापासून तालिबान राजवटीत अमली पदार्थ उत्पादक सक्रीय झाले आहेत. तेथे उपलब्ध कच्च्या मालाद्वारे अमली पदार्थ तयार करून ते पाकिस्तानात आणले जातात व पाकिस्तानातून समुद्रमार्गे त्याची भारतात तस्करी करण्याचे प्रयत्न मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असे प्रयत्न हाणून पाडण्याचे नवे आव्हान नौदलासमोर आहे.
नौदलाची मुख्य भूमिका समुद्रात दबदबा निर्माण करणे ही असते. मात्र आता अमली पदार्थ तस्करीच्या घटना वाढल्याने नौदल, तटरक्षक दल व नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांतर्गत राष्ट्रीय समुद्री सुरक्षा समन्वयक हे विशेष कार्यालय सुरू करण्यात आले आहे. समुद्रातून होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीसंबंधी महत्त्वाची गुप्त माहिती या समन्वयकांकडे येते व त्यानंतर ती नौदलाला सोपविली जाते. नौदलाकडे ही माहिती आल्यानंतर संबंधित तस्करीचा आवाका, अमली पदार्थ घेऊन येणारे जहाज किंवा बोट कुठल्या क्षेत्रात आहे, त्याचा आकार किती आदींचा अभ्यास केला जातो. त्यानुसार कारवाई कोणी करायची, याबाबत नौदलाकडून नियोजन केले जाते व तशी कारवाई केली जाते. मागील चार महिन्यांत अशा प्रकारे तस्करी रोखण्याचे काम नौदल व तटरक्षक दलाने केले आहे. अशा काही घटना अरबी समुद्रात घडल्या असल्याचे नौदलातील सूत्रांनी सांगितले.
एकूणच समुद्री सुरक्षा, किनारपट्टी सुरक्षा, समुद्रातील मदत व बचावकार्य अशी विविध प्रकारची कामे करणाऱ्या नौदलावर आता आणखी एक जबाबदारी आली आहे.
२०० सागरी मैलापलीकडे नौदलाकडून चोख कारवाई
‘गुप्त माहिती नौदलाकडे येत असते. त्याचे विश्लेषण केल्यानंतर संबंधित तस्करी किनारपट्टीपासून २०० सागरी मैलापलीकडे असल्यास नौदलाकडून त्याविरुद्ध कारवाई केली जाते. ही तस्करी २०० सागरी मैलापर्यंत असल्यास तटरक्षक दलाकडून कारवाई केली जाते. त्यासाठी नौदल त्यांच्याशी समन्वय साधून सहकार्य देते’, असे पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.














