सावंतवाडी : भारतातील एकूण ४८ संस्थानापैकी एक म्हणजे सावंतवाडी संस्थान. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या संस्थानमध्ये अनेक शुरवीर राजे महाराजे होऊन गेले. या राजांच्या सहधर्मिणींनी देखील संस्थानात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात पराक्रमी राजांसह त्यांच्या शूर राण्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली आहे. हाच वारसा जपत आहेत त्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले. राजपत्नीला शोभून दिसतील असे गुण त्यांच्या अंगी आहेत. राजघराण्याच शैक्षणिक, कला-सांस्कृतिक, अध्यात्मिक, आरोग्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच रॉयल पर्यटनावर त्यांनी अधिक भर दिला आहे.
गुजरात सौराष्ट्र येथील दाेडीया घराण्यातील श्रध्दाराजे यांच्याशी युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांचा विवाह झाला. राजघराण्याच्या इतिहासात प्रथमच सावंतवाडीच्या राजवाड्यात हा शाही विवाह पार पडला होता. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले हा राजेशाही वारसा पुढे घेऊन जात असताना युवराज लखमराजेंना सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहासाची कास धरून उद्योग व पर्यटन व्यवसायात युवराज लखमराजे अन् युवराज्ञी श्रद्धाराजे यांनी पाऊल टाकलं आहे. ऐतिहासिक ठेवा, राजेशाही थाट याला जराही धक्का न लागू देता ''सावंतवाडी पॅलेस'' बुटिक आर्ट हॉटेल त्यांनी राजवाड्यात साकारलय. राजेसाहेब श्रीमंत रघुनाथराजे भोंसले यांच्या काळात उभारलेल्या 'ताईसाहेब वाडा' इथं हा प्रोजेक्ट साकारला आहे. राजघराण्याचा हा 'पॅशन प्रोजेक्ट' आहे. अलिशान परंतु इतिहासाची साक्ष देणारा राजघराण्याकडून साकारण्यात आलेला हा पर्यटन प्रकल्प देश-विदेशातील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. यासह सावंतवाडीत आलेला पर्यटक शहरात फिरावा शहरातील व्यवसायिकांना नफा मिळावा या उद्देशाने त्यांनी काही योजना आखल्या आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी उभारलेले 6 रूम हे गंजिफा कलेतील विष्णूच्या दशावतारावर आधारित आहेत. याला त्याच धर्तीवर मत्स्य, कुरमा, वराह, नरसिंह, वामन, परशुराम अशी नावं दिलीत.
युवराज अन युवराज्ञी हे दोघेही शेफ आहेत. परदेशात याच क्षेत्रात त्यांनी उच्च शिक्षण घेतल आहे. नवनवीन पदार्थ बनवणे हा त्यांचा छंद आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना संधी देण्यात आली आहे. या ठिकाणी काम करणारी टीम ही स्थानिक आहे. या माध्यमातून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच काम त्यांनी केले आहे. स्वतः युवराज्ञी श्रद्धाराजे यात जातीने लक्ष घालतात. विदेश सोडून स्वदेशी येत आपल्या मातीत राहणं त्यांनी पसंत केले आहे. राजेसाहेब शिवरामराजे भोंसले, राजमाता सत्वशिलादेवी यांनी सातासमुद्रापार पोहोचवलेल्या गंजिफा कलेला जातीनं लक्ष घालून त्या ही कला जोपासत आहेत. सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात पराक्रमी राजांसह त्यांच्या शूर राण्यांनी केलेल्या कार्याची दखल इतिहासान घेतली आहे. हाच राजेशाही वारसा युवराज्ञी श्रद्धाराजे सांभाळत असून पुढे घेऊन जात आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त टीम कोकणसाद LIVE कडून त्यांना लाख लाख शुभेच्छा....!