सावंतवाडी : 2019 च्या निवडणुकीनंतर भाजप व शिवसेना युती तुटली अन् 'मविआ'ची स्थापना झाली. परंतु, नुकतंच सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं अन् भाजप- बाळासाहेबांची शिवसेना अशी नवी युती जन्मला आली. कोकणात खरेदी-विक्री संघात सर्वप्रथम या दोघांत युती झाली. खरेदी-विक्री संघात या दोघांच्या ताकतीपुढे महाविकास आघाडीचा निभाव लागला नाही. हाच पॅटर्न ग्रामपंचायत निवडणुकीत राबविण्यात आला. परंतु, अगदी शेवटपर्यंत युती होणार की नाही ? याची स्पष्टता नव्हती. अखेर दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानं ही युती केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मात्र, बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणाव तसं यश या निवडणुकीत मिळालं नाही. युती करून लढल्यानंतर देखील शिंदे गटावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वरचढ ठरला. भाजपनं मात्र आपला नंबर १ कायम ठेवत सर्वाधिक सरपंच व उपसरपंच बसवले.
यातच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका तोंडावर आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल आहे. तशी चाचपणी देखील इच्छुक उमेदवार, पक्षाचे स्थानिक नेते आपापल्या पातळीवर करत आहेत. यातच मध्यंतरी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत वेगळेच लढा असं खुलं आव्हान मंत्री दीपक केसरकर यांना दिलं. या निवडणुकीत विशेषतः सावंतवाडी शहरात भाजप व केसरकर समर्थक यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यात युती झाली तर सर्व समिकरण बदलणार आहेत. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून माजी सभापती व पोटनिवडणुकीत निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागणारे खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याच जाहीर करून टाकल. त्यामुळे थेट नगराध्यक्षासाठी जर युती झाली अन् आरक्षण ओपन पडल तर नगराध्यक्ष पद मंत्री केसरकरांच्या गटाकडे जाणार ? की भाजप आपला उमेदवार देणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यातच मंत्री केसरकर यांनी रविवारी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत सुचक विधान केलं. ते म्हणाले, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची राज्यात युती आहे. सेना-भाजपनं वेगवेगळ्या निवडणुका लढवता कामा नये, सत्तेत आपण एकत्र आहोत. ही एकी प्रत्येक निवडणुकीत राहीला पाहिजे असे विचार मी नेहमी मांडत असतो. या विचारावर मी ठाम आहे असं मत व्यक्त करत त्यांनी आगामी निवडणुकीत युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
दरम्यान, केसरकरांच्या सुचक विधानानंतर आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुकांच्या 'हार्ट बिट्स' मात्र कमालीच्या वाढल्यात. युती झाली तर दोन बलाढ्य पक्षातील कोणत्या मातब्बरांच तिकीट फायनल होतंय अन् कोणाच कापलं जातंय हे पहावं लागेल. जागा एक अन् दावेदार अनेक अशी अवस्था आगामी निवडणुकीसाठी दिसत आहे. यातून सुवर्णमध्य काढताना स्थानिक नेत्यांसह वरिष्ठांचाही चांगलाच कसं लागणार आहे. मंत्री केसरकर यांच्या विधानानंतर स्थानिक भाजपची नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात हे देखील पहावं लागेल. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे मंत्री केसरकर यांच्या सुचक विधानानंतर आगामी स्थानिक निवडणुकांत भाजप- बाळासाहेबांची शिवसेना पक्षांतील दोस्ती टिकणार ? की दोस्तीत कुस्ती होणार ? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.
तुर्तास दोन्ही पक्षाच्या इच्छुकांच्या हार्ट बिट्स वाढल्या असून युतीच्या निर्णयाकडे त्यांच लक्ष लागलं आहे. तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गट 'वेट अँड वॉच'च्या भुमिकेत दिसत आहेत.