
कुडाळ : शासनाच्या विविध धोरणांमुळे सरकारी व अनुदानित शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षण हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने येत्या ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात कुडाळ तालुक्यातून किमान ७००, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २५०० ते ३००० नागरिक सहभागी होतील, अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षक संजय वेतुरेकर आणि अंकुश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये मंगळवारी या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी विविध सामाजिक संघटना, शिक्षणप्रेमी, संस्थाचालक, सरपंच, शिक्षक आणि पालकांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची पार्श्वभूमी व प्रमुख मागण्या स्पष्ट करण्यात आल्या. या वेळी प्रशांत आडेलकर, युगांत चव्हाण, आर्या होळकर, स्नेहा शिरसाट, ज्ञानेश्वर सावंत, आनंद राठये आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय वेतुरेकर म्हणाले, "स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ते गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले. ज्या शाळांमधून अनेक पिढ्या घडल्या आणि देश निर्माण झाला, त्याच सरकारी शाळा आज बंद करण्याचे धोरण शासन राबवत आहे. राज्यभरात स्वयं-अर्थसहाय्यित व खासगी शाळांचे पेव फुटले असून, याचा थेट फटका ग्रामीण, शोषित, दलित आणि बहुजन घटकांतील मुलांना बसत आहे. शाळा ही केवळ एक इमारत नसून गावचे भूषण आणि गावाचा आत्मा आहे. हे आंदोलन शिक्षक किंवा नोकरवर्गाच्या वैयक्तिक हितसंबंधांसाठी नसून केवळ विद्यार्थी, पालक आणि समाजकेंद्रित आहे."
अंकुश कदम यांनी सांगितले की, "गेल्या आठ दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्या जात असून शाळा बंद पडण्याच्या धोरणांविरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष आहे. ५ ऑक्टोबर रोजी पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून १० हजारांहून अधिक नागरिक मुंबईत एकवटतील. ही लढाई केवळ सरकारविरोधात नसून शिक्षणसम्राट व भांडवलदारांविरोधातील आरपारची लढाई आहे. करदात्या नागरिकांना मोफत शिक्षण व आरोग्य देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. ७० वर्षांत ग्रामस्थांनी पदरमोड करून उभारलेल्या शाळा बंद करणे म्हणजे पूर्वजांच्या त्यागाची थट्टा आहे. त्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पक्षीय दबाव बाजूला ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा."
गावोगावी जनजागृती बैठकांचे आयोजन
मुंबईतील धरणे आंदोलनाची जनजागृती अधिक तीव्र करण्यासाठी बुधवारपासून कुडाळ तालुक्यातील गावोगावी लहान-लहान बैठकांचे सत्र आयोजित केले जाणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.











