LIVE UPDATES

बनावट कागदपत्रांप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकावर फौजदारी कारवाई करा

उपसरपंच विजय नेमळेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; कोळंब ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उपोषणाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 23, 2026 10:35 AM
views 182  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : कोळंब ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार, दस्तऐवजांमध्ये फेरफार आणि बनावट कागदपत्रांप्रकरणी सरपंच व संबंधित ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय नेमळेकर यांनी ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य संजना शेकटकर, संपदा प्रभू, स्वप्निल परब व नंदा गावकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात कोळंब ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गेल्या चार वर्षांपासून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निधीतील कथित अपहार, दस्तऐवजांमध्ये फेरफार तसेच बनावट कागदपत्रांचा समावेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात वेळोवेळी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांचाही सहभाग असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

दि. १६ जून २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीचा संदर्भ देत, आर्थिक अपहाराच्या प्रकरणात सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ८४ हजार रुपये भरल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन ग्रामसेवक प्रकाश सुतार यांच्याकडून पूर्ण वसुली झालेली नसताना १ लाख २२ हजार रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आल्याचा आरोप निवेदनात आहे.

तसेच कोळंब ग्रामपंचायतीच्या मुळ रजिस्टर क्रमांक २३ मध्ये रस्त्यांच्या नोंदींमध्ये रुंदी व लांबीबाबत फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी ग्रामसभा न घेता बनावट इतिवृत्त तयार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर दहा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने ते तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र ठोस कारवाई न झाल्याने ३० सप्टेंबरला सदस्य, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांसह उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे नेमळेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.