निवडणूक लोकसभेची, तयारी विधानसभेची !

घालमेल बाशिंग बांधलेल्या इच्छुकांच्या समर्थकांची....!
Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2024 13:40 PM
views 277  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकांच बिगुल वाजल्यांनंतर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 'अबकी बार, ४०० सो पार'चा नारा दिला. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत संपण्याच्या दिशेने वाटचाल होत असताना महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार अद्याप ठरत नाही आहे. लोकसभेच्या या रणधुमाळीत मात्र, होऊ घातलेल्या विधानसभांची मोर्चेबांधणी सुरू आहे. 'महायुती' असो वा 'महाआघाडी' घरोघरी मातीच्या चुली ! अशीच अवस्था या मतदारसंघात आहे. विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ इच्छुकांना आमदारकीच स्वप्न पहाण्याची संधी देत आहे.

त्याच झालं असं की लोकसभेला महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे की शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत ? यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे विद्यमान खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल घेऊन १६ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. परंतू, महायुतीचा उमेदवार ठरत नाही आहे. लोकसभेच्या या धामधुमीत स्थानिक पातळीवरील मात्र आगामी विधानसभेसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. इच्छुक उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ तर रत्नागिरीत राजापूर, चिपळूण या मतदारसंघात पडद्यामागून हालचाली होत आहे‌त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघ भाजपकडे, कुडाळ शिवसेना ठाकरे समर्थक तर सावंतवाडी शिवसेना शिंदे समर्थकांच्या ताब्यात आहे. यातील सावंतवाडीवर 'महायुती' आणि 'महाआघाडी'तील सगळ्याच मित्रपक्षांचा डोळा आहे. सगळ्यांनाच सावंतवाडीतून आमदार व्हायचं आहे. शनिवारी भाजपचे विधानसभा प्रमुख असणारे राजन तेली यांनी ठेवलेला 'हट्टापायी' स्टेटस चांगलाच चर्चेचा ठरला. त्यात जिल्ह्यातील कडवे विरोधक केसरकर-राणेंची झालेली मैत्री म्हणजे 'युती धर्म पाळा, संकट टाळा !' असाच संदेश देऊन जातेय. महायुतीत अनेक उमेदवार या मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे महाआघाडीची देखील तशीच काहीशी परिस्थिती आहे. शिवसेना ठाकरे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार समर्थक आणि कॉग्रेस सध्या एकत्र असले तरी तिघांकडूनही मतदारसंघावर दावा केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंनी  पूर्णपणे ताकद लावून आपली यंत्रणा कामाला लावली आहे. ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस दबक्या आवाजात उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. लोकसभेनंतर महाआघाडीत देखील इच्छुक 'बाशिंग' बांधण्याच्या तयारीत आहेत. 

एकंदरीतच, महायुतीसह महाआघाडीत तीन-तीन पक्ष एकत्र आल्यानंतर लोकसभेच्या आडून विधानसभेची फिल्डिंग लावत आहे. इच्छुकांची बांशिंग तयार असून लोकसभेनंतर युती-आघाडी कायम राहिल्यास उमेदवारीची लॉटरी कुणाला लागणार ? व कुणाची संधी हुकणार ? या विचारानं भावी आमदारांच्या समर्थकांची चांगलीच घालमेल होत आहे.