
सावंतवाडी : जनतेकडून फक्त 720 दिवस मागून नगरपरिषदेवर सत्ता मिळवत विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपाच्या माध्यमातून नेमका कोणता विकास साध्य केला ? दीपक केसरकरांनी जिथे नारळ फोडले तिथे गवत उगवलं असा टोला उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा या निवडणुकीत जनशक्तीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. राऊळ म्हणाले, नितेश राणेंनी आश्वासन दिलेल्या कंटेनर थिएटर तसेच सांडपाण्याचा प्रश्नाचे नेमके काय झाले ? केवळ सावंतवाडीकरांची फसवणूक करण्याचे काम केले अशी टीका केली. नगरपरिषदेची होऊ घातलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. आम्ही जनशक्ती म्हणून निवडणुकीत उतरलो आहोत. त्यामुळे येथील जनता यावेळी धनशक्तीला नाकारून, जनशक्तीचा विजय करत सावंतवाडी मध्ये इतिहास घडवेल असा विश्वास श्री राऊळ यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सीमा मठकर, शहर संघटक निशांत तोरस्कर, युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार देवा टेमकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरामध्ये मागच्या पोटनिवडणुकीत जनतेकडून 720 दिवसाची मुदत मागत नितेश राणे यांनी नगरपरिषदेवर सत्ता मिळवली. परंतु, 720 दिवसात त्यांनी विकास सोडाच, त्यांनी सावंतवाडीकरांची फसवणूक करण्याचे काम केले. सावंतवाडीत कंटेनर थिएटरचे भूमिपूजन करण्याचे काम त्यांनी केले. मात्र, कंटेनर थिएटर कुठे उभे राहिले ? तसेच शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार असे आश्वासन त्यांनी दिले. सांडपाण्याचा प्रश्न आजही जशास तसा आहे. दुसरीकडे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा शहरात केवळ विकासाचे नारळ फोडले. मात्र, नारळ फोडलेल्या ठिकाणी आज गवत उगवले आहेत. मल्टीस्पेशालिटीचे आश्वासन दाखवीत भूमिपूजन केले. त्या ठिकाणी आज डांबर घालावे लागले आहे. एकूणच, केवळ सत्तेचा उपभोग करत येथील जनतेच्या डोळ्यावर धुळपेक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे येथील जनतेकडून या सर्वांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. सावंतवाडीच्या सुशिक्षित सुजाण नागरिकांनी आम्हाला प्रामाणिकपणे एकदा संधी द्यावी, आम्ही त्या संधीचे सोने करून भ्रष्टाचार मुक्त सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
श्री. राऊळ पुढे म्हणाले, नगरपरिषदेच्या रिंगणात उतरताना आम्ही आघाडीसाठी प्रयत्नशील होतो आणि आजही आम्ही आघाडी संदर्भात आशावादी आहोत. वरिष्ठांकडून यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केवळ किरकोळ गोष्टीवरून काँग्रेसकडून जोडून घेतले जात नसल्याने हा तिडा निर्माण झाला आहे. परंतु, मला खात्री आहे की यावर वरिष्ठ लक्ष घालतील आणि 21 तारीख नंतर निश्चितच आम्ही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढू. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरून या निवडणुकीला सामोरे जात आहोत आमची स्पर्धा ही कोणाशीही नाही. आम्ही जनतेसमोर विकासाचे व्हिजन घेऊन जाऊ निश्चितच येथील जनता आमच्या सोबत राहील.
तसेच आमदार केसरकर यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. परंतु, उबाठाच्या माध्यमातून मला नगराध्यक्ष पदासाठी आलेली संधी आपण दवडत त्या संधीचा सोनं करण्याचा निर्णय घेतला. निश्चितच सर्वांच्या मदतीने आपण यामध्ये यशस्वी होऊ, सावंतवाडी शहराचा विकासाचा मुद्दा लक्षात घेता येथिल हॉस्पिटलचा प्रश्न गंभीर आहे. लहानपणी बघितलेले हॉस्पिटल आणि तेथील समस्या आजही तसेच आहे. आज देणगी काढून त्या ठिकाणी मदत होते हे दुर्दैवी आहे. एकूणच जनतेने संधी दिल्यास नक्कीच शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल असे मत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांनी व्यक्त केले.










