''काय गाववाल्यानू, बरा आसा मां ?'' या पहिल्याच प्रश्नाने मामाच्या गावी येऊन भाच्याने साऱ्यांचे मन जिंकले. महाराष्ट्रातील संगीतकार, दिग्दर्शक, गायक, कवी-लेखक अवधूत गुप्ते यांनी सावंतवाडीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुळातच हे 'रॉकस्टार' तरुणांच्या गळ्यातील ताईतच म्हणा ! पण ते सुंदरवाडीत आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकलेसुद्धा !! सावंतवाडीतील सांस्कृतिक महेात्सवाचा समारोप सोहळा अवधुत गुप्ते यांच्या बहारदार संगीताने संस्मरणीय झाला. सिंधुदुर्गातील एका लेकीने घडवलेला हा अष्टपैलू कलाकार म्हणजे महाराष्ट्राचा एक अनमोल हिरा आहे. हे सिंधुदुर्गचे भाग्यच आहे. एवढेच नाही तर सिंधुदुर्गासाठी अभिमानास्पद आहे.
असे म्हणतात, दु:ख विसरायला लावण्याचे फार मोठे सामर्थ्य कलाकारापाशी असते. हजारो-लाखोंच्या जनसमुदायाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कलाकारापाशी असते. प्रेक्षकांच्या भावना जागृत करण्याचे सामर्थ्य कलाकारापाशी असते. अवधुत गुप्ते यांनी गायनाबरोबरच त्यांच्या आकर्षक नटखट शैलीतील संवादाने खचाखच भरलेले जिमखाना मैदान अक्षरश: भारावून सोडलेले पहायला मिळाले. त्यांच्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ते मिसळले, तेव्हा मैदानावरील त्यांच्या चाहत्यांनी नृत्याचा ठेका धरला. हा ठेका कार्यक्रमाच्या अंतिम क्षणापर्यंत कायम होता. प्रेक्षकांशी उत्तम संवाद साधत, मायबोली मालवणीतून शब्दफेक करीत त्यांनी कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवला.
अवधूत गुप्तेंनी कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वत:ची ओळख करुन देताना सावंतवाडीतील मळगाव हे आपले आजोळ असल्याचे सांगून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दरवर्षी आईबरोबर गणपतीला गावी येणे व्हायचेच. त्यावेळी गणपतीला धोतर नेसायचो. वाढलेल्या भाताच्या हिरव्या शेतातून चालताना ते धोतर हातांनी वर धरुन चालावे लागायचे. तसाच चालत मळगावच्या मुख्य रस्त्यावर यायचो. आईसक्रीम खावेसे वाटले की सावंतवाडीत यायचो. मोठेपणी गावी आल्यावर न चुकता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आवर्जून भेटायचो. आपल्या आईला गावी 'पपी' म्हणतात. आता आईची तब्येत बिघडत असल्याने गावचा गणपती मुंबईतच पुजतो. तरीही बालपणीच्या आठवणी मात्र ताज्या आहेत. आता आजोळचा कार्यक्रम खासच करायचा, असा आईचा संदेश आहे. त्यामुळेच सावंतवाडीतील कार्यक्रम आपणांसाठी खास असल्याचे त्यांनी सांगितले.
मळगावातील एक भगिनी मंगला राऊळ म्हणाल्या, की '' हो. आजही अवधुत गुप्ते गावी येतात. त्यांच्या घरी भजन असले म्हणजे सर्वांनी सुचवलेली गाणी ते म्हणून दाखवतात. त्यांच्या घरी मोठी विहीर आहे. मे महिन्यात आजुबाजूच्या विहीरी तळ गाठतात. यांच्या विहिरीला मात्र वर्षभर पाणी असते. मे महिन्यात आजुबाजूची सर्व माणसे यांच्या विहिरीचे पाणी नेतात.''
तर, या कार्यक्रमाला जबरदस्त सुरुवात झाली. प्रारंभी छत्रपती शिवरायांना 'सारेगमप' कार्यक्रमातील पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजातील गाण्याद्वारे मुजरा करण्यात आला. महाराजांच्या स्मरणानंतर पद्मनाभ यांनी स्वत: संगीतबद्ध केलेली गाणी ऐकवून रसिकांना रिझविले. अवधूत गुप्ते मंचावर येताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यांनी 'मोरया' चित्रपटातील मोरया गाणे सादर करुन प्रेक्षकांना जिंकून घेतले. ''काय सांगू राणी मला गाव सुटंना, चुलीवरच्या भागरीची चव सुटंना'' हे गाणे सादर केले. अवधुत गुप्ते यांनी या गाण्यासाठी साथ दिली. त्यानंतर 'सूर नवा-ध्यास नवा' पर्वाची महागायिका सन्मिता धापटे-शिंदे आणि अवधुत गुप्ते यांनी गायलेल्या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील 'उन उन व्हटात..' या गाण्यावर रसिकांनीही ठेका धरला.
विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळी भागातील शैतकऱ्यांची दैना सांगणारे अरविंद जगताप लिखित ''पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही, पावसाची वाट बघण्यात आता काही गंमत नाही..'' हे गाणे सादर करताच प्रेक्षकांचेही डोळे पाणावले. शेतकरी म्हणताच महाराष्ट्रातील अवघा शेतकरी वर्ग आणि पंढरीचा विठूराया डोळ्यासमोर उभा राहिला. कारण हा विठूराया शेतकऱ्यासाठी एकमेव वाली असतो. या गाण्यातून समाजातील विषमतेचे भीषण वास्तव समोर उभे राहिले. पुढच्याच क्षणी अवधूत गुप्तेंनी 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती ? हे गाणे सादर केले. यावेळी विठूनामाने अख्खे मैदान भक्तीमय झालेले पहायला मिळाले.
मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वप्नील प्रभू यांनी संगीतबद्ध केलेले ''सोशल मीडियावाली रानी मी, हॅश टॅगवाली कहानी मी, हे वागनं बरं नव्हं !'' या सादर केलेल्या गाण्याने तरुणांच्या काळजाचा ठेका चुकवला. तरुणांमधील जोश कायम ठेवत त्यानंतर अवधुत गुप्ते यांच्या 'लावण्यवती' अल्बममधील ''पावनं अवो पावनं ..' ही ठसकेबाज लावणी सादर केली. लगेचच पुढे 'दगडी चाळ' चित्रपटातील ''डाळींबी रंगाची, मिरचीच्या अंगाची मैना मी सायबा…. राघू पिंजऱ्यात आला'' हे गाणे सादर केले.
त्यानंतर पुन्हा अवधूत गुप्तेंनी सुत्रे हाती घेत त्यांच्या 'विश्वामित्र-ब्रोकन हार्ट' अल्बममधील नवे कोरे ''वंगाळ वंगाळ … विश्वामित्राला मेनकेनं डाळलं'' हे गाणे सादर करुन धुव्वा उडवून दिला. लगेचच सन्मित्रा व अवधूत यांनी ''बस गं लवकर मारुया स्टार्टर जाऊया भुर्रर्र' हे गाणे सादर केले. त्यानंतर मुग्धा कऱ्हाडे यांच्यासोबत 'ऐका दाजीबा' गाणे म्हणून प्रेक्षकांना थिरकायला लावले. पुढे प्रेक्षकांमध्ये उतरुन अवधूत यांनी अक्षरश: धमाल उडवून दिली. शांत बसलेल्या अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांनी यावेळीपासून नृत्य अदाकारी दाखविण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रेक्षकांमध्ये मिसळून ''तेरे नखरे है कमाल.. ए पोरी जरा हळुहळु चाल'', '' उंदीरमामा आयलो, खाटीपोना लिपलो'' ही जबरदस्त गाणी सादर केली. पुढे प्रत्येक गाण्यानंतर 'आता कसं वाटतंय..?' या प्रश्नावर प्रेक्षकांमधून 'गार गार वाटतंय..' असे उत्तर मिळू लागले. एकूणच, गायक आणि प्रेक्षकांमध्ये अखेरपर्यंत समरसता पहायला मिळाली. प्रेक्षकांच्या उदंड आणि स्वयंस्फूर्त प्रतिसादामुळे गानवृंदांमध्येही उत्साह पहायला मिळाला.
पुढे गुप्ते यांनी सादर केलेल्या ''राजचं राजं आलं जिंकुनिया जगभरी..'' या गाण्यालासुद्धा प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळाला. पुढच्या सगळ्याच गाण्यांनी जादू केली. 'काळी माती निळं पाणी' हे गाणे अवधूत व सन्मित्रा यांनी सादर केले. मुग्धा कऱ्हाडे व अवधूत यांचे ''पावनं जेवला काय'' , ''आरं देवा रं देवा.. उगाच का म्हणतात तुला मायाळू कनवाळू… आम्ही लग्नाळू '' ही गाणी भारदस्त आवाजात, जबरदस्त ठेक्यात सादर केली. या गाण्यांनाही प्रेक्षकांचा कमाल प्रतिसाद पहायला मिळाला.
'खुपते तिथे गुप्ते' फेम अवधुत गुप्ते यांनी आपल्या वादकांची ओळखसुद्धा तालासुरात वैशिष्ट्यपूर्ण करुन दिली. त्यानंतर ''शिट्टी वाजली आन् गाडी सुटली'' हे बहारदार गाणे सादर केले. रॉयल रोमर्स तसेच मंत्रीमहोदयांचे आभार व्यक्त केले. 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याने या कार्यक्रमाचा शानदार समारोप झाला. विशेष म्हणजे अवधूत गुप्ते मंचावर असेपर्यंत प्रेक्षक मैदानावर होते. सुरुवातीलाच 'आय लव्ह यू' म्हणत त्यांनी उपस्थित प्रत्येकाला जिंकून घेतले.
तर, सिंधुदुर्गात आजोळी येणारी आजची बालके उद्या अवधूत यांच्यासारखी अष्टपैलू व्यक्तिमत्वे बनावीत. मामाच्या गावी भाच्याचे कौतुक असतेच, नाही का ! सिंधुदुर्गकन्यांनी हे ध्यानी घ्यावे, ही एक सदिच्छा!
सौ. मंगल नाईक-जोशी, सावंतवाडी