राजकारणात थोडंफार नाव कमावलं, की प्रत्येकाला ओढ लागते ती नेता बनण्याची! नेता बनून कुठलं ना कुठलं पद मिळवणं ही अभिलाषा घेऊन प्रत्येकजण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो, मात्र याला अपवाद असलेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे मालवण तालुक्यातील घुमडे गावचे सुपुत्र अशोक वासुदेव सावंत..... राणेसाहेब अर्थात कोकण वासीयांचे लाडके "दादा" यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख सदस्य असलेल्या अशोक सावंत यांनी ग्राउंडवर राहून जनसेवा हीच ईश्वरसेवा या पद्धतीने कोणत्याही राजकिय महत्वाकांक्षेशिवाय आपलं सामाजिक काम सुरू ठेवलं आहे. श्री. सावंत यांचा आज ९ डिसेंबर रोजी 60 वा वाढदिवस... त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा...
अशोक सावंत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्व! मालवण तालुक्यातील घुमडे गावचे रहिवाशी असलेल्या अशोक सावंत यांचा जन्म ९ डिसेंबर १९६३ रोजी मालवण तालुक्यातील गोळवण येथील त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे वडील मुंबईत एका रंगाच्या कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईतील भायखळा येथे झाले. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता घुमडे गावी येऊन व्यवसायात लक्ष घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईतील भायखळा येथे लहानपण गेल्याने स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्या नसानसात भरले होते. त्यामुळे मुंबईतुन गावी आल्यानंतर शिवसेनेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळी कोकणात शिवसेना आता कुठेतरी आकार घेत होती. १९८५ मध्ये अशोक सावंत यांची घुमडे येथील शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी कामगार नेते गुरुनाथ खोत आणि भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गावागावात शिवसेना वाढवण्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना आमदारकीच्या निवडणूकीसाठी मालवणात पाठवले. त्यावेळी नारायण राणेंना सर्वप्रथम निवडून आणण्यात ज्या मोजक्या शिवसैनिकांनी जीवाचे रान केलं, त्यामध्ये अशोक सावंत यांचाही महत्वाचा सहभाग होता. या निवडणुकीत नारायण राणे आमदार झाले त्यावेळेपासून नारायण राणे आणि अशोक सावंत यांचे एक नाते निर्माण झाले आहे. हे नाते आज ३० वर्षांहून अधिक काळ कायम आहे.
जून १९८९ च्या दरम्यान पंजाबच्या मोगा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दहशतवादी हल्ला होऊन २५ स्वयंसेवकांची क्रूर हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यावेळी अशोक सावंत यांनी मालवण शहरातील भरड नाक्यावर एसटी बस अडवून बसच्या टायर मधील हवा सोडली. त्यावेळी पोलिसानी त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली. हा विषय मोठा गाजला, त्यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी या घटनेची दखल घेऊन विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी अशोक सावंत हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आले. त्यातून बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आक्रमक अशोक सावंत सर्वानी अनुभवले.
सक्रिय राजकारणात अशोक सावंत यांनी सहभागी होत १९९२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी देवबाग जिल्हा परिषद मतदार संघातून जि. प. सदस्यपदी त्यांची निवड झाली. तर १९९७ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागली. १९९७-९८ मध्ये मालवण पंचायत समिती सभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या कालावधीत सभापती कसा असावा, हे अशोक सावंत यांनी कृतीतून दाखवून दिले. १९९९ मध्ये मालवण तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा स्वतः पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी मदतकार्य सुरू केलं. त्यामुळे जनतेच्या मनातला नेता म्हणून त्यांची ओळख बनली. २००२ मध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यावेळी त्यांची कारकीर्द सर्वत्र गाजली. याच कालावधीत नारायण राणेंचे शिवसेनेत बिनसल्यानंतर त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील संपूर्ण टीमचे नेतृत्व करून हा गट त्यांनी काँग्रेस सोबत नेला. नारायण राणे हे रत्नपारखी आहेत, हिऱ्याची पारख खरा रत्नपारखीच करू शकतो. त्यामुळे राणेसाहेबांनी अशोक सावंत यांच्यातील गुण ओळखून स्वतःच्या अष्टप्रधान मंडळात त्यांना मानाचं स्थान दिलं. त्यावेळपासून आजपर्यंत हे स्थान अशोक सावंत यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर टिकवून ठेवलं आहे. १९९० च्या काळात राणे साहेबां सोबत असणाऱ्या अनेकांनी आज स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी वेगळं नेतृत्व स्वीकारून स्वतंत्र विचारधारा स्वीकारली. पण अशोक सावंत डगमगले नाहीत. ते सदैव राणे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी कधीही त्यानी दबावतंत्र वापरलं नाही की अशोक सावंत पक्ष सोडणार, अशा वावड्या देखील त्यांनी कधी उठायला दिल्या नाहीत.
राजकारणा बरोबरच सामजिक क्षेत्रात देखील त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे ते नेतृत्व करतात. तर राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. कंत्राटी कामगारांची संघटना चालक कामगारांच्या न्याय हक्कांसाठी वेळोवेळी संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली आहे. बीएसएनएल कंत्राटी कामगारांचे नेतृत्व देखील त्यांनी केले. या कालावधीत अधिकारी वर्गाशी सौर्दाहपूर्ण संबंध ठेवत कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे महावितरण आणि बीएसएनएलच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात देखील अशोक सावंत यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.
प्रत्येक राजकिय पक्षात गटातटाचे राजकारण पाहायला मिळते. आपल्याच पक्षातील सहकारी नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्नही होतात. असे प्रकार अशोक सावंत यांच्या बाबतीत घडले. मात्र पक्षांतर्गत विरोधकांना ते पुरेपुर पुरून उरले. २००५ मध्ये राणेसाहेबांनी अशोक सावंत यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पक्षातील काही हितशत्रूनी अशोक सावंत कसे कमकुवत अध्यक्ष आहेत, हे नारायण राणेंना दाखवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सावंतांना अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षाच्या काही सदस्यांना हाताशी धरून प्रश्नावली दिली. काहीही करून अशोक सावंत यांना अडचणीत आणायचे हा चंग पक्षातील काही सहकाऱ्यांनी बांधला होता. मात्र याची कुणकुण अशोक सावंत याना लागली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या कामे देण्याचा अधिकार होता. अशोक सावंत यांनी रातोरात पक्षातील काही सहकाऱ्यां बरोबरच विरोधकांमधील काही महत्त्वाच्या सदस्यांना काही लाखांची विकास कामे मंजूर करून त्याची पत्रे त्या सदस्यांना घरी जाऊन पोहोच केली. हा सर्वाना धक्का होता. त्यामुळे पहिल्याच सभेत सर्व सदस्यांनी अशोक सावंत यांना साथ दिल्याने ही सभा कमालीची यशस्वी ठरली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर "जादूगार सावंत' हा अग्रलेख लिहिला होता. त्या लेखाची मोठी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय गोटात झाली. त्यातून अशोक सावंत यांनी आपला राजकिय चाणाक्षपणा दाखवून दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तीन दशकांपेक्षा जास्तकाळ सक्रिय राजकारणात कार्यरत असताना कोणताही स्वार्थ न ठेवता स्वच्छ प्रतिमा आणि निष्ठेचा एक आदर्श अशोक सावंत यांनी निर्माण केला आहे. आज भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून अशोक सावंत पक्षीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे. गोरगरीब जनतेस जेवढे शक्य होईल त्या प्रमाणात मदतीचा हात देणे, हे काम ते करीत असून राजकीय पटलावर काम करताना नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी ते कार्यरत आहेत. पक्ष कार्य करताना आपले समर्थक नव्हे तर राणेसाहेबांच्या विचाराचे व पक्षाचे कार्यकर्ते वाढवणे हेच धेय्य त्यांनी जपले आहे. अश्या या स्वच्छ प्रतिमेच्या निष्ठावंत व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आज साजरा होत आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक व व्यावसायिक जीवनातील यशस्वीतेसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा !!!