AGRICULTURE | आता काजू लागवड करा सेंद्रिय पद्धतीनं !

प्रमोद जाधव, उप आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग, यांचा विशेष लेख
Edited by: प्रमोद जाधव, उप आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग
Published on: December 31, 2022 12:36 PM
views 1611  views

काजू हे  वरकस डोंगराळ जमिनीतही  येणारे एक महत्त्वाचे झाड आहे. काजू लागवड व प्रक्रिया मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आदिवासी तसेच ग्रामीण भागातील बांधव ओल्या बी पासून काजूगर काढून विकतात. त्यातही चांगला नफा मिळतो. सध्या तयार काजूगराला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरवर्षी परदेशातून काजू बी भारतात आयात करतात. भारतातील लघु उद्योजक बी सोलून काजूगर काढतात व काजूगराची देश-विदेशात विक्री करतात. थोडक्यात आपल्या गरजे एवढे काजू आपण देशात पिकवत नाही. त्यामुळे काजू लागवड व प्रक्रियेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काजू विकास योजना सुरु करण्याची घोषणा अलीकडे केली आहे.

सेंद्रिय काजू काळाची गरज

सध्या जगभरात विषमुक्त अन्नाची मागणी वाढत आहे. बी पासून लागवड केलेल्या गावठी काजूवर रोगराई येत नाही असा ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना कीटकनाशकांवर खर्च करावा लागत नाही. चव अतिशय उत्तम असते. हे गावठी काजू सेंद्रिय असतात. 

वाराणशी संशोधन संस्था कर्नाटक ने सेंद्रिय काजू बाबत संशोधन करून पुस्तक प्रकाशित केले आहे. विविध शेतकऱ्यांचे अनुभव, कृषी विद्यापीठ व संशोधन संस्थांचे कार्य यांचा समन्वय राखून सेंद्रिय पद्धतीने काजू लागवड कशी करता येईल याचे विवेचन करत आहे.


(1) मूलस्थानी लागवड (In situ plantation)

सध्या प्रामुख्याने नर्सरीतून आणलेली पिशवीतील कलमे लावण्यात येतात. पिशवीत मुळे गुरफटतात. पिशवी उचलताना बाहेर आलेली मुळे तुटतात. प्रवासात मुळांना इजा होते. इजा झालेल्या मुळांतून खोडकीडा आत शिरण्याची शक्यता असते. कलम लागवडीत झाडाला आधार देणे, पाणी घालणे आवश्यक असते.

मात्र मूलस्थानी बी पासून लागवड केल्यास अनेक समस्यांवर मात करता येते. बी पासून तयार झालेले हे रोप जागीच वाढत असल्याने सोटमूळ व अन्य मुळांची अतिशय चांगली वाढ होते. यामुळे अशी झाडे पाण्याचा व इतर ताण सहन करू शकतात. खड्ड्यामध्ये कंपोस्ट किंवा शेणखत भरून व जिवाणू खते मिसळून कलमा ऐवजी बी ची लागवड करावी. चार महीन्यापर्यंतची बी वापरावी. भरीव बी पाण्यात टाकल्यास तळाशी बुडते. मध्यम किंवा मोठ्या आकाराची भरीव बी निवडावी. लागवडीपूर्वी एक दिवस आधी बी भिजत पाण्यात घालावे. पावसाळा सुरु झाल्यावर बी पासून लागवड करावी. 

एका खड्ड्यात दोन ते तीन बिया आजूबाजूला लावाव्या. रोप उगवून आल्यानंतर रोपाला दोन बाजूला दोन दले दिसतात. यामध्ये झाडाचे अन्न असते. त्यामुळे ही दले पक्षी, प्राणी किंवा अन्य कुणामार्फत खाल्ली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. यासाठी आजूबाजूला गवत टाकणे, प्लॉस्टीकची बाटली किंवा अन्य साहीत्याने आडोसा करणे व देखरेख करणे इत्यादी उपाय करावेत .

प्रत्येक खड्ड्यातील एक चांगले रोप निवडावे. उरलेली दुर्बल झाडे दोन-तीन महिन्यानंतर काढून टाकावीत. 

सुमारे एक वर्षांनंतर या मजबूत रोपाला चांगल्या जातीचे कलम करावे. कलमाच्या जोडाच्या खाली मूळ झाडाला फूट येते ती वेळोवेळी काढावी. त्यामुळे जोड दिलेला कलमाच्या वरच्या भागाला जोर मिळतो सुमारे दोन-तिन महिन्यानंतर जोडावर बांधलेली प्लास्टिक पट्टी काढावी. काजू कलम उत्कृष्ट होण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे. कलम केल्यावर 60 व 90 दिवसांनी 50 मिली लिटर गोमूत्र पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि गोमूत्र झाडाजवळ ओतावे. पाण्यात मिसळून गोमूत्र देणे सोयीस्कर होईल. 

(2) जातीची निवड – लवकर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारी च्या थंडीत फुले येणाऱ्या झाडांवर टी मॉस्किटो नावाच्या किटकांचा मोठा प्रादुर्भाव होतो व खूप नुकसान होते. त्यामुळे खुप किटकनाशके फवारावी लागतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता फेंब्रुवारी ते एप्रिल मध्ये वाढत असल्याने मध्य किंवा उशिरा फुल येणाऱ्या झाडांवरती टी मॉस्किटो फारसा येत नाही. त्यामुळे मध्य किंवा उशिरा हंगामात फुले येणाऱ्या जाती सेंद्रिय शेतीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

(3)  मित्र कीटक - लाल मोठे मुंगळे (हुंबळे) या टी मॉस्किटो च्या नैसर्गिक शत्रू आहेत. जंगलातून किंवा अन्य झाडांवरून ते आणावेत. काजूच्या झाडाभोवती गुळ ठेवून तेथे सोडावे. हुंबळे काजूच्या झाडावर रहिवास करून वसाहती निर्माण करतात. यामुळे टी मॉस्किटो वर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.


मित्र किटक


(4) सेंद्रिय कीटकनाशके- सेंद्रिय पद्धतीने केलेल्या बागेतील झाडांची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी असते. टी मॉस्किटो वर काही प्रमाणात सेंद्रिय कीटकनाशकांमुळे नियंत्रण मिळवता येते. (अ) सिताफळ किंवा रामफळाच्या बिया/ पाने 15%, अडुळसा पाने 12% करंज पाने 20%, तसेच पाणी मिसळलेले काजू टरफल तेल त्याचे मिश्रण करावे. काजू टरफल तेला ऐवजी रिठा साल 30% मिसळावे. या मिश्रणाच्या फवारणीमुळे काही प्रमाणात टी मॉस्किटो वर नियंत्रण मिळवता येते. 

(5) हिरवळीचे खत - करंज व अडुळसा पाने यांचे हिरवळीचे खत म्हणून वापर करता येतो. त्यामुळे काजू बागेच्या कुंपनात सिताफळ, रामफळ, अडुळसा, करंज व रिण ही झाडे जरूर लावावीत. कोकणात श्रावण महिन्यात गवत कापून पालापाचोळा झाडाच्या जवळपास घालण्याची पध्दत आहे. पुढील दोन महिन्यात त्याचे कुजुन खत होते.

(6) काजूवरील खोडकीडा (रोठा) रोगाचे नियंत्रण – काजूचे खोड किंवा उघडी तसेच इजा झालेली मुळे यातून किड आत शिरते व झाडाला पोखरत मध्यभागी पोहोचते. खोडातून चिक येऊ लागतो. अशावेळी झाड खरवडून किड मारावी. नंतर त्यावर शेण व मातीचे मिश्रण लावावे. उघड्या मुळांवर माती टाकावी. या किडीच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी झाडाजवळील मातीत निंबोळी पेंड मिसळावी. 

(6) झाडाचा आकार (Canopy Management) - काजू झाडाला 1 मीटर पर्यंत येणाऱ्या सुरूवातीच्या फांद्या काढाव्या. म्हणजे झाडाबाजूची साफसफाई करणे तसेच रोठा व इतर रोगाची तपासणी करणे सोपे जाते.  

(7) सेंद्रिय खते - कोंबडी खत, शेणखत, कंपोस्ट, निंबोळी पेंड, एरंड पेंड, करंज पेंड इ, विविध पेंड, मच्छी कुटा अशी सेंद्रिय खते तसेच जीवामृत व विविध जिवाणू खते काजू झाडाला अत्यंत उपयुक्त आहेत. भारतात प्राचीन काळात आयुर्वेद प्रमाणेच वृक्ष आयुर्वेद विकसित झाले. त्यात वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे. वृक्ष आयुर्वेद मध्ये नमूद कुणापजल व इतर खते कीटकनाशके यांचा चांगला उपयोग होतो. AAHF या संस्थेने याबाबतची पुस्तके इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध केली आहेत.

(8) काजू अवशेष पुनर्वापर- सेंद्रिय व नैसर्गिक शेतीत उरलेल्या अवशेषांचा पुनर्वापर करणे आवश्यक असते. काजू पाने व काजू बोंड यापासून चांगले कंपोस्ट करता येते. काजू बोंड बायोगॅसच्या टाकीत टाकल्यास बायोगॅसचे प्रमाण वाढते. बायोगॅस स्लरी चा काजू झाडांसाठी चांगला उपयोग होतो.

(9) गोमूत्राचा उपयोग - कोकण कृषी विद्यापीठाने गोमूत्राचा वापर करण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत. काजू बियांचे उत्पादन व आकारमान वाढवण्यासाठी ताजे किंवा आठ दिवस साठवलेले गोमूत्र वापरावे. पंचवीस टक्के गोमूत्र प्रत्येक मोठ्या झाडाला पाच लिटर फवारावे. (सुमारे सव्वा लिटर गोमूत्र व चार लिटर पाणी) तसेच 25% गोमूत्राचे दहा लिटर द्रावण ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक  महिन्यात  एकदा असे चार वेळा  झाडाजवळ जिरवावे.

(10)  बायोचार (सुपीक कोळसा) चा उपयोग - जमिनीत 2 टक्के पेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असल्यास ती सुपीक समजली जाते. शास्रज्ञाना अमेझॉनच्या खोऱ्यात सर्वाधिक सुपीक जमीन टेराप्रेटा आढळली. यात 10 टक्के सेंद्रिय कर्ब आहे. या जमिनीत बायोचार कोळसा मोठ्या प्रमाणात वापरला आहे. कमी हवेत लाकूड पालापाचोळा जाळल्यास बायोचार तयार होतो. घरगुती चुलीतही असा कोळसा तयार होतो. हा कोळसा सच्छिद्र असतो. त्यामुळे जिवाणू खते किंवा सेंद्रिय खताच्या स्लरीत मिसळून वापरल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो व उत्पन्नाची वाढ होते. नायजेरिया या देशात केलेल्या प्रयोगात बायोचार व सेंद्रिय खत मिसळून वापरल्यास काजूची चांगली वाढ होते असे आढळले.

(11) काजूची फलधारणा वाढविणे - काजूची फुले सुरुवातीच्या 3 वर्षात काढून टाकावीत. म्हणजे झाडाची वाढ चांगली होते. त्यानंतर काजूची फलधारणा व उत्पन्न वाढवण्यासाठी स्वस्त सुकविलेल्या माशांचा अर्क 50 ग्रॅम घ्यावा. तो दहा लिटर पाण्यात मिसळावा. फुले येताना पहिली फवारणी करावी व पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी. यामुळे परपरागीकरणासाठी उपयुक्त कीटक वाढतात व उत्पन्न वाढते.

(12) जलसंधारणासाठी नारळ टरफलांचा उपयोग - काजूची लागवड प्रामुख्याने वरकस डोंगराळ जमिनीत करण्यात येते. काजूचा फुलोरा व फळधारणा अवस्थेत पाण्याची जास्त गरज असते. अशावेळी पाणी मिळाल्यास उत्पन्न वाढते. पाण्याची उपलब्धता वाढण्यासाठी उताराच्या जमिनीत सलग समतल चर इत्यादी उपाय करावेत. काजूच्या दोन रांगात साडेतीन मीटर लांब एक मीटर रुंद व अर्धा मीटर खोल चर घ्यावेत. यात नारळाची टरफले टाकावी व वर पालापाचोळा व माती टाकावी यामुळे जमिनीत ओलावा टिकण्यास मदत होते. अशी विविध तंत्रे काजू संशोधन संचालनालय पुत्तूर कर्नाटक यांनी शोधली आहेत.

(13) काजू व आंतर पिके - काजूमध्ये उडीद, सुरण, घोरकंद, अननस, आले व हळद अशी आंतरपिके घेता येतात.

(14) संशोधक शेतकरी बनुया – विविध शेतकऱ्यांनी स्थानिक गावठी झाडातून उत्तम प्रकार निवडले आहेत. याची स्वतः कलमे करून लागवड केली आहे. त्यापासून भरपूर उत्पन्न घेतात. मी त्यांची वेळोवेळी भेट घेऊन माहिती घेत असतो. गोवा राज्यात श्री. राजाराम मावळणकर हे संशोधक शेतकरी राहतात. यातील एम वन जातीच्या काजू ची बी मोठ्या आकाराची व चवदार आहे. श्री. कृष्णा रामा धुमाळ, ता. म्हसळा, जि. रायगड तसेच श्री. अनंत प्रभु आजगांवकर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या शेतकऱ्यांनीही चांगल्या गावठी काजू निवडून लागवड केली आहे.

मोठ्या बीच्या गावठी काजूला भट्टे काजू, डग्गळ काजू असे स्थानिक भाषेत म्हटले जाते. सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातत्याने चांगले उत्पादन देणारी गावठी काजू झाडे निवडून त्याची लागवड करून उत्पन्न वाढवता येण्यासारखे आहे. अशा प्रकारे विविध उपाय करून सेंद्रिय काजू लागवड करता येते.

प्रमोद जाधव, उप आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग