सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शहराच्या सीमेवरील चराठा गावची विहीर बोलू लागली असतानाच आता शहराच्या सीमेवरील कारीवडे गावातील कचरा डेपो देखील बोलू लागलाय. कचरा डेपोच हे मनोगत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर व्हायरल केल जात आहे.
यात कचरा डेपो बोलतोय, मी कचरा डेपो बोलतोय. सगळे लोक माझ्याकडे वाईट नजरेनीच बघतात पण, ह्यामध्ये माझा काय दोष आहे तुम्हीच सांगा ??? मला कारिवडे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी कशाला आणून बसवलात ? सगळ्या सावंतवाडी शहराचा दररोज कचरा माझ्याकडे दिला जातो. प्लास्टिक आणि सगळा निकृष्ट कचरा जाळून टाकला जातो. पण, ह्याचा त्रास जनतेला तसेच तुमच्या उद्या मोठे होणाऱ्या मुलबाळांना होणार आहे हे कोणच बघत नाही. मध्यवर्ती ठिकाणी माझा विस्तार हा छोटा नाही आहे तर तब्बल ६ एकरमध्ये माझा विस्तार होणार, भविष्यात त्यापेक्षा सुद्धा मी वाढू शकतो.
मला समजत माझा त्रास सर्वांना होणार आहे. दररोज कचरा जाळून धूर निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होणार, हृदय विकाराचे त्रास निर्माण होणार, अनेक रोग गावात पसरणार आहे.तसेच प्रकल्पच्या दृष्टीने कचरा विलगीकरण केले जाणार पण जमिनीतून इतर लोकांच्या जमिनी ना सुद्धा हानी पोचणार आहे. पिकाची जमीन असेल ती सुद्धा नपिक होणार आहे. काही ठिकाणी जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत ते सुद्धा माझ्यामुळे दूषित होणार आहे. गावात दूषित पाणी पुरवठा होणार आहे.तसेच कारीवडे गावातून मुख्य नदी वाहते त्या नदीमध्ये सुद्धा ओलसर कचऱ्याचे दूषित पाणी असेल ते सोडल जाणार त्यामुळे अनेकांची जनावरे सुद्धा ह्या नदीत पाणी पिण्यासाठी येत असतात ती जनावरे सुद्धा दगावू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही कसे काय जगणार ? तुमच्या शेतीची जमीनच जर नपिक झाली तर तुम्ही शेती कशी करणार ? पाणी खराब झाले तर लोकांना पाण्यासाठी दुसरा स्रोत शोधावा लागू शकतो किंवा पाण्यासाठी हिंडावे लागेल अशी मोठी समस्या उद्भवू शकते.
कचरा डेपो म्हंटल की डोळ्यासमोर एक चित्र उभ राहते ते म्हणजे कचऱ्याचे मोठं मोठे ढीगारे..,ओला कचरा कुजवला जाणार, प्रक्रिया होताना दुर्गंधी निर्माण होणारच मला पण कळतंय सर्वांना माझा त्रास होणार दुर्गंधी वाढणार आहे. पण मी काय करू तुम्हीच मला सांगा...मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरात कचरा डेपो च्या शेजारील गावामध्ये रोगराई पसरल्यावर स्थलांतर करावे लागते त्याच प्रमाणे आपल्या कारीवडे गावाला स्थलांतरीत व्हावे लागेल. मोठ्या शहरातील परिसरात काय परिस्थिती होतेय लोकांची तीच परिस्थिती मी जिथे होत आहे तिथे होणार आहे. अतिशय भयंकर वेळ ही तुमच्या सर्वावर येणार आहे.
मला रोखा म्हणून गावातील सत्ताधारी लोकांनी खोटी आंदोलन केली पण दुसरी बाजू बघितली तर परवानगी चा दाखला का दिला ??? गावातील सत्ताधारी आणि नगरपालिकेतील सत्ताधारी ह्यांचं साटेलोटे होते म्हणूनच मी इथे उभा झालो. दिवसाचं तुम्हांला दाखवायला आंदोलन केली आणि संध्याकाळी एकत्र बसले अशा दोन भूमिकेमुळे मला येण्यास सोयीस्कर झाले. वेळीच माझे स्थलांतर होणे गरजेचे आहे मी आपल्याला सांगतो नाहीतर अख्खा गांव तुमचा भकास होण्यास वेळ लागणार नाही, गावातील सत्ताधारी लोकांना पूर्ण विरोध करून कठोर भूमिका घेतली असती तर मी कारीवडे च्या मध्यवर्ती ठिकाणी आलोच नसतो ना..! असं मनोमन हा कचरा डेपो व्यक्त करत आहे.
ही पोश्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चराठेच्या विहीरीनंतर सीमेवरील कचरा डेपो बोलू लागल्यानं ग्रामपंचायतीच्या धामधुमीत चर्चेचा विषय बनला आहे. परंतु, आजच विहीर, कचरा डेपो कसे काय बोलू लागलेत ? असा सवाल मात्र ग्रामस्थांना पडला आहे.