वेंगुर्ला : केळूस कालवी बंदर येथील हेमंत शेलटकर यांनी संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ५३ पिल्लांना केळूस सरपंच योगेश शेटये यांच्या उपस्थितीमध्ये समुद्रात सोडण्यात आले.
केळूस कालवी बंदर येथील हेमंत शेलटकर यांच्या माध्यमातून केळूस कालवी बंदर किनाऱ्यावर ऑलीव्ह रिडले या कासवाचे संवर्धन होत आहे. यावर्षी प्रथमच ३१ जानेवारी २०२३ पासून श्री. शेलटकर यांनी कासवाच्या अंड्याचे संवर्धन करण्यास सुरु केले. आतापर्यत केळूस कालवीबंदर येथे एकूण २४ घरट्यातुन २७३८ अंडी संवर्धित करण्यात आलेली आहेत. या संवर्धित केलेल्या अंड्यातून आतापर्यत १४५९ कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आलेली आहेत.
केळूस कालवी बंदरच्या किनारपट्टीवर हेमंत शेलटकर प्रामाणिकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कासवांचे संवर्धन करत आहेत. मठ वनरक्षक सुर्यकांत मनोहर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण रात्रीचा कडक पहारा देवून तसेच किनारपट्टीवर फिरती करुन या कासवांच्या अंड्याचे संर्वधन हेमंत शेलटकर करतात. या कालावधीत तब्बल दोन वेळा त्यांना बिबट्याचे दर्शन सुद्धा घडले. पण शेलटकर यांनी आपले काम काही थांबविले नाही आणि यामुळेच वांयगणी येथील कासव महोत्सवात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले होते.
हेमंत शेलटकर यांनी कासव संर्वधनासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल केळूस सरपंच योगेश शेटये यांनी कौतुक केले. यावेळी केळूस मच्छीमार सोसायटी चेअरमन गोविंद उर्फ दादू केळूसकर, ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ आबा वराडकर, ग्रामपंचायत सदस्या मानसी कुडव, ग्रामपंचायत सदस्य रुचिरा प्रभूकेळूसकर, केळूस खारभूमी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रविंद्र प्रभूकेळूसकर, पुणे येथील पर्यावरण प्रेमी पर्यटक अतुल घाग, ग्रामस्थ दिपक राऊळ, अशोक कुबल आदी उपस्थित होते.
साधारणत: नोव्हेबर ते मार्च या दरम्यान ऑलिव्ह रिडले जातीचे कासव रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर अंडी घालण्याकरीता येतात. एक कासव साधारणत २० ते २८ दिवसांनी तीनवेळा अंडी घालतात ही अंडी ४० ते १८० पर्यत असतात. अमावास्या ते संकष्टी या दरम्यान ही अंडी कासव घालतात व सुमारे ४५ दिवसांनी पिल्ले बाहेर यायला सुरुवात होते. जन्मल्यापासून पिल्लांना चाचड, मुंग्या तसेच वाढत्या उष्णतेचा, भटकी कुत्रे, घारी, कावळे यांचा धोका असतो.
- हेमंत शेलटकर