
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना, दुसरीकडे २२ तलाव व धरणांमधील गाळ काढण्यासाठी तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचा ठेका देऊनही संबंधित स्वयंसेवी संस्थेने अद्याप एकाही तलावातील गाळ उपसा केला नसल्याची धक्कादायक बाब जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत उघड झाली.
मार्च २०२६ मध्ये कामाचा आदेश देऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याने सदस्य मनोज रावराणे यांनी संबंधित संस्थेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळीच गाळ उपसा झाला असता, तर तलावांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली असती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पुढील आठवड्यात संबंधित संस्था, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव आणि संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक घेण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा सोमवारी (२३ नोव्हेंबर) येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष सटविलकर, प्रितेश राऊळ, समिती सदस्य मनोज रावराणे, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, वर्षा सांबारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे आदी उपस्थित होते.
२ कोटी २० लाखांचा ठेका, काम मात्र शून्य
जिल्ह्यातील २२ तलाव व धरणांमधील गाळ उपसा करण्यासाठी संबंधित संस्थेला प्रत्येक तलावासाठी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २० लाख रुपयांचा ठेका मंजूर करण्यात आला आहे. मार्च २०२६ मध्ये कामाचा आदेश देण्यात आला. जून अखेरीस पावसाला सुरुवात होण्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी संबंधित संस्थेकडे सुमारे तीन महिन्यांचा कालावधी उपलब्ध होता. मात्र, या कालावधीत एकाही तलावातील गाळ उपसा करण्यात आला नाही.
पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ उपसा महत्त्वाचा असताना, वेळेत काम न झाल्याने त्याचा उद्देशच निष्फळ ठरत असल्याचे मनोज रावराणे यांनी निदर्शनास आणले. विशेष म्हणजे हा निधी मार्च २०२७ पर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. त्यामुळे कामासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध असतानाही सुरुवात का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकाच स्वयंसेवी संस्थेला एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे का देण्यात आली? कामाची प्रगती तपासली जात आहे का? ठेका देऊनही प्रत्यक्ष काम सुरू न करणाऱ्या संस्थेवर काय कारवाई होणार? असे प्रश्न उपस्थित करत रावराणे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही काम रखडल्याबद्दल खंत व्यक्त केली. संबंधित संस्था, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष-सचिव आणि अधिकारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सांडपाणी प्रकल्पांसाठी जागाच नाही; मार्च २०२७ ची मुदत कशी गाठणार?
कणकवली तालुक्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही जागा मिळत नसल्याने सदस्य मनोज रावराणे यांनी नाराजी व्यक्त केली.
अन्य प्रकल्पांचीही अशीच स्थिती असल्याचे सांगत, कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२७ ही अंतिम मुदत असताना जागा कधी मिळणार, कामे कधी सुरू होणार आणि मुदतीत पूर्ण कशी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील या योजनांची प्रगती समाधानकारक नसल्याचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी स्पष्ट करत कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
दूषित पाण्याच्या अहवालात गावांची गफलत; उपाध्यक्ष दादा साईल यांचा आक्षेप
दूषित पाण्याच्या नमुन्यांच्या अहवालाचे वाचन सुरू असताना कुडाळ तालुक्यातील गावांच्या आरोग्य केंद्रांबाबत चुकीची नोंद झाल्याचा मुद्दा उपाध्यक्ष दादा साईल यांनी उपस्थित केला. हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दाखविण्यात आलेली काही गावे प्रत्यक्षात पणदूर व कडावल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाने दूषित पाण्याचे अहवाल सादर करताना गावांचा संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांशी असलेला संबंध तपासूनच माहिती द्यावी. केवळ अहवाल सादर करण्यासाठी घाईघाईने माहिती देऊ नये, अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तलावांची साठवण क्षमता वाढविणे, सांडपाणी व घनकचरा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आणि दूषित पाण्याबाबत अचूक माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, या कामांतील दिरंगाई आणि नियोजनातील त्रुटी समितीच्या सभेत समोर आल्या. निधी उपलब्ध असूनही कामे रखडत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








