LIVE UPDATES

घोटगे-सोनवडे घाट रस्त्याला केंद्राची मंजुरी

४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांचा जोरदार जल्लोष
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 13:36 PM
views 142  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घोटगे-सोनवडे घाट रस्त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत जोरदार जल्लोष केला. या ऐतिहासिक निर्णयानंतर स्थानिक जनतेने राणे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आहेत.हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, यासाठी गेल्या चार दशकांपासून सातत्याने मागणी होत होती. या मार्गासाठी कै. प्राध्यापक महेंद्र नाटेकर आणि कै. सुशांत दळवी यांनी उपोषण करत तीव्र लढा दिला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार नारायण राणे यांनीही या मार्गासाठी भरीव पाठपुरावा केला होता.

अखेर या प्रदीर्घ संघर्षाला मोठे यश आले असून, आमदार निलेश राणे यांनी या प्रलंबित मुद्यावर विधिमंडळात व प्रशासकीय स्तरावर सतत आवाज उठवून या मार्गासाठी महत्त्वाची प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली आहे.
रस्त्याच्या या महत्त्वाच्या मंजुरीनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जाणार असून नवीन आराखडा व तांत्रिक मान्यता निश्चित करणे, केंद्रीय पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून जनसुनावणी आणि भूसंपादन  कारवाई झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक आणि व्यापारी दृष्टीने, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी तसेच वाहतूक व दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटून विकासाला मोठी गती मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या आनंदोत्सवात गणेश बुटाले, सचिन तेली, आशिकेश शेटये, चेतन ढवळ, नारायण गावडे, जनार्दन गुरव, बाळा राणे, अमित मढव, बाळकृष्ण मढव, उमेश घाडी, रामा तावडे ,हरिषचंद्र चव्हाण यांच्यासह परिसरातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.