
देवगड : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून, येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी सामाजिक जाणीव जपत एक अत्यंत प्रेरणादायी आणि आगळावेगळा उपक्रम राबवला. ऊन, वारा, पाऊस आणि प्रत्येक कठीण प्रसंगाला न घाबरता अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या आणि शुभेच्छा संदेश सीमेवरील जवानांना पाठवल्या आहेत.
"आम्ही आपल्या घरात आणि समाजात सुरक्षित सण साजरा करू शकतो, कारण सीमेवर आमचे वीर जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत," ही भावना व्यक्त करत विद्यार्थिनींनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.
देवगड टपाल कार्यालयाच्या विशेष सहकार्याने या राख्या, शुभेच्छापत्रे आणि संदेश सुरक्षितपणे सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे, या उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी कर्तव्यात तत्पर असणाऱ्या पोस्टमन 'भाऊ' यांनाही राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थिनींच्या या देशभक्तीपर आणि संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.












