
वैभववाडी : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध महत्त्वाची वैद्यकीय पदे रिक्त असून, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य देवानंद पालांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
याबाबत श्री पालांडे यांनी मंत्री राणे यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात , तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ १, बालरोगतज्ज्ञ १ आणि भुलतज्ञ १ अशी एकूण तीन पदे रिक्त असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचारासाठी कणकवली, ओरोस तसेच कोल्हापूर येथे जावे लागत आहे.
त्यामुळे या रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करून तालुक्यातील रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालांडे यांनी केली आहे.पालकमंत्री राणे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.












