LIVE UPDATES

Yelondewadi Dam : येलोंदेवाडी धरणग्रस्तांना ९५ कोटींचा मोबदला मिळवून दिला

उर्वरित पुनर्वसनाचे प्रश्नही लवकरच मार्गी लावणार : आमदार भास्कर जाधव यांचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 03:42 PM
views 79  views
MLA Bhaskar Jadhav reviews compensation and rehabilitation work for Yelondewadi Dam project-affected families

चिपळूण :  तालुक्यातील येलोंदेवाडी धरणाच्या उभारणीपासून पुनर्वसनापर्यंतच्या कामांसाठी आपण सुरुवातीपासून पुढाकार घेतला. तीन गावांतील धरणग्रस्तांना तब्बल ९५ कोटी १८ लाख ९० हजार ५८१ रुपयांचा मोबदला मिळवून दिला असून, पुनर्वसनाची उर्वरित कामेही लवकरच मार्गी लावण्यात येतील. त्यासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला. तसेच, केवळ निवेदन दिल्याने निधी मंजूर होत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

येलोंदेवाडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात शुक्रवारी (दि. २३) शिरवली सहाण येथे लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी येलोंदेवाडी धरणात आमदार भास्करराव जाधव यांनी जलपूजन केले. आढावा बैठकीला देवखेरकी, नारदखेरकी आणि शिरवली येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी आमदार जाधव यांनी धरणाच्या उभारणीपासून मोबदला आणि पुनर्वसनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

नव्या भूसंपादन कायद्यामुळे अधिक मोबदला

आमदार जाधव म्हणाले की, येलोंदेवाडी धरणाच्या उभारणीसाठी सुरुवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. पाध्ये काका, तांबे आणि रामपूरचे जोशी यांच्यासह अनेकांनी या कामासाठी सातत्याने योगदान दिले. परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी धरणाची आवश्यकता असल्याचा आपला अनेक वर्षांचा अभ्यास होता. त्यातूनच धरणाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला.

धरणाच्या उभारणीपूर्वी ग्रामस्थांना पुनर्वसनाचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे, घरांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया आणि जमिनीच्या मोबदल्यासंदर्भातील बाबी समजावून सांगण्यात आल्या. जिल्हाधिकारी, महसूल, पाटबंधारे, फलोत्पादन विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली.

धरणासाठी २०११-१२ मध्ये भूसंपादन झाले. त्यानंतर २०१३ मध्ये नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आल्याने नव्या कायद्यानुसार मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयात बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. परिणामी, धरणग्रस्तांना पूर्वीच्या तुलनेत अधिक मोबदला मिळाल्याचे जाधव यांनी सांगितले.

धरणाची मूळ किंमत २१ कोटी; धरणग्रस्तांना ९५ कोटींचे वाटप

देवखेरकी, नारदखेरकी आणि शिरवली या तीन गावांतील धरणग्रस्तांना एकूण ९५ कोटी १८ लाख ९० हजार ५८१ रुपयांचा मोबदला देण्यात आला. धरणाची मूळ किंमत २१ कोटी २४ लाख रुपये असताना प्रकल्पग्रस्तांना ९५ कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला. घरांच्या मूल्यांकनापासून झाडांच्या मोबदल्यापर्यंत अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे आमदार जाधव यांनी नमूद केले.

श्रेयवादावरून विरोधकांना टोला

धरणाच्या कामाबाबत श्रेयवादावरून टीका करताना आमदार जाधव म्हणाले की, एखाद्या नेत्याला पत्र दिले आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला, अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र, अशा दाव्यांची सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने पडताळणी केली पाहिजे. किती कामे सुरू झाली, किती पूर्ण झाली आणि किती कामांना प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाला, याची तपासणी करूनच विश्वास ठेवावा. या प्रक्रियेत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांची आठवण ठेवली जात नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीला कार्यकारी अभियंता श्री. सोनार, उपअभियंता विपुल खोत, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, उपतालुकाप्रमुख संदीप चव्हाण, पंचायत समिती सदस्या संजीवनी खापरे यांच्यासह देवखेरकी, नारदखेरकी आणि शिरवली येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व धरणग्रस्त उपस्थित होते.