
सावंतवाडी : माजगाव येथील 'उर्मी' गरबा नाईट या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. 'नवस्वयंसिद्धा' म्हणून गौरवत सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारत कला संगम ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास होती. कोकणसाद LIVE च्या मुख्य उपसंपादक जुईली पांगम यांना 'नवस्वयंसिद्धा' म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
माजगाव येथे आयोजित 'उर्मी' गरबा नाईटला तुफान प्रतिसाद मिळाला. भारत कला संगम ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा 'नवस्वयंसिद्ध' म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यात कोकणसाद LIVE च्या मुख्य उपसंपादक आणि न्यूज अँकर जुईली पांगम, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ रिया सावंत, ब्युटीशियन, मेकअप आर्टिस्ट आणि अकॅडमी संचालिका शीतल सावंत, बांदा येथे कॅफे 1721 या कॅफेच्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत असलेल्या तुलजा प्रशांत कोचरेकर, युगा फॅशन हाऊसच्या संस्थापक युगा पोकळे, कुशल मेहंदी आर्टिस्ट प्राची सावंत, फोटोग्राफर, फूड स्टायलिस्ट आणि आर्ट डायरेक्टर तन्वी चव्हाण, अभिनेत्री कंटेट क्रियेटर रुचिता शिर्के यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच वकीली आणि ॲंकरिंग या दोन्ही क्षेत्रांत स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तृत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ॲड. प्रणिता भक्तराज राऊळ, नृत्य आणि मॉडेलिंग क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्व पूजा सावंत - राणे, 'चला जाऊ' या इंस्टाग्राम पेजवर ‘कोकणातली नवदुर्गा’ ही विशेष मालिका चालवलेल्या कंटेंट क्रिएटर सुयोग खांडाळेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, अध्यक्षा स्तुती गुरव, ॲड. तेजस परब, ॲड. कौस्तुभ गावडे, प्रदीप्ती कोटकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. उर्मी आणि भारत कला संगम ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून असेच विविध उपक्रम राबविले जावेत. सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा उद्देश स्तुत्य स्वरूपाचा असल्याची भावना सौ. भोसले यांनी व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तर प्रास्ताविकात भारत कला संगम ट्रस्ट हा शासनमान्यता प्राप्त ट्रस्ट असून कला, संस्कृती, शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.
ट्रस्टतर्फे गायन, नृत्य, चित्रकला, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम, शेती, कृषी, पर्यटन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालये तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना, कलाकारांना आणि नवोदित प्रतिभावंतांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी दिली जात असल्याचे अध्यक्षा स्तुती गुरव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उद्घाटन व गौरव सोहळ्यानंतर उपस्थितांनी गरबा नाईटचा आनंद लुटला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही स्वतः सहभागी होत फेर धरला. यावेळी साक्षी सावंत हिने देवीचं रूप घेत केलेली एन्ट्री विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमातील रील कॉम्पिटिशनला सोशल मीडिया प्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी कार्यक्रमातील खास क्षण टिपून कल्पक रील्स तयार केल्या. आपल्या ओघवत्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाने कोकण अँकर ॲड. प्रणिता कोटकर - राऊळ हिने अधिक रंगत आणली.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भारत कला संगम ट्रस्टच्या अध्यक्षा स्तुती गुरव, उपाध्यक्ष रसिका नाईक, सचिव संकेत कुवेस्कर, सहसचिव चंद्रकांत बोरभाटकर, खजिनदार साईश्वर गुरव, विश्वस्त किशोर सरनोबत, गोपाळ कोरगावकर यांसह पदाधिकारी, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी प्रदीप्ती कोटकर, प्रतीक्षा तांडेल, अवधूत राणे, ॲड. तेजस परब आणि कुणाल विवेक खोत यांनी सांभाळली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








