
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथील उत्कर्ष नगर परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद स्थितीत असलेली महावितरणची ३३ केव्ही (KV) लाईन सध्या स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या लाईनचे विद्युत खांब अत्यंत सडलेल्या आणि जीर्ण अवस्थेत असून, शुक्रवारी रात्री यातील एक भलामोठा खांब खालून वाकला असून एका नारळाच्या झाडाला अडकल्याची गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने हा खांब झाडावर अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला, तरीही महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सदर ३३ केव्ही लाईनचे खांब जीर्ण झाले असून ते कधीही कोसळू शकतात, याची पूर्वकल्पना स्थानिक रहिवाशांनी महावितरण प्रशासनाला आधीच दिली होती. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन या धोकादायक खांबांची पाहणीसुद्धा केली होती. मात्र, पाहणी केल्यानंतरही महावितरणने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या याच निष्क्रियतेमुळे काल रात्री एक खांब तुटून झाडावर लटकला आहे.
ज्या ठिकाणी हा खांब कोसळून अडकला आहे, त्या लगतच घरगुती वीज पुरवठा करणारी लाईन गेलेली आहे. तसेच अगदी जवळच स्थानिक नागरिक निलेश प्रभु यांचे निवासस्थान आहे आणि अनेक वाहने उभी असतात. हा खांब जर थेट खाली कोसळला असता, तर वाहनांचे नुकसान होऊन मोठी जीवितहानी झाली असती.
याशिवाय, याच लाईनमध्ये आणखी दोन विद्युत खांब आणि एक टॉवर अत्यंत धोकादायक आणि जीर्ण स्थितीत उभे आहेत. या संवेदनशील परिसरात बापू पिंगुळकर, घोलेकर, सुरेश प्रभु, वेतुरेकर, विलास भोसले या सर्व नागरिकांची राहती घरे आहेत. यामुळे या भागातील रहिवाशांच्या आणि लहान मुलांच्या जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे.
तातडीने कारवाई करण्याची मागणी
मागील काही महिन्यांपासून बंद असलेली ही लाईन हटवावी किंवा यातील सर्व धोकादायक खांब व टॉवर त्वरित बदलून परिसरातील नागरिकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी उत्कर्ष नगरमधील ग्रामस्थ करत आहेत. महावितरणने आता तरी जागे होऊन अपघात घडण्यापूर्वी तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करावी; अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेला आणि नुकसानीला महावितरण प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








