LIVE UPDATES

किरण-हृषिकेश बिरवाडकरांचे भक्तिगीत सुपरहिट

बिरवाडकर बंधूंचे शब्द अन् सूर; 'व्हॉइस ऑफ कोकण'वर गाणे हिट; "देवा सजवून झाली ही आरासना" गाण्याची गणेशभक्तांमध्ये धुमाकूळ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 04, 2026 12:13 PM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

महाड | सुजित धाडवे

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागताच गणेशभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहू लागतो. घरातील सजावट, रोषणाई आणि बाप्पाच्या स्वागतासाठी चाललेली लगबग या सर्व भावभावनांना सुरांमध्ये गुंफणारे "देवा सजवून झाली ही आरासना" हे नवंकोरं भक्तिगीत नुकतेच भक्तांच्या भेटीस आले आहे. बाप्पाच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने समर्पित करण्यात आलेले हे गाणे प्रदर्शित होताच सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून गणेशभक्तांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे.

कोकणातील महाड तालुक्यातील नरवण हे गाव आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि कलाकारांच्या योगदानासाठी ओळखले जाते. या गावातील कलाकारांनी शाहिरी वारसा, तमाशा कला आणि भजनांच्या माध्यमातून कित्येक दशके लोककलेची सेवा केली आहे. शंभू राजू घराण्याचे शीघ्रकवी, ब्रह्मानिष्ठ परमपूज्य गुरुवर्य काशीराम हरी कुंभार, गुरुवर्य पांडुरंग बुवा नांदवीकर, ज्येष्ठ शाहीर सुरेश वरवटकर आणि शाहीर प्रल्हाद शिरशिरकर यांसारख्या थोर शाहिरांचा मोठा वारसा या भूमीला लाभला आहे. नरवण गावाने लोककलेला अनेक दिग्गज कलाकार दिले असून सुरेश आणि प्रदीप, प्रल्हाद आणि रवींद्र, संतोष आणि शितल, महादेव आणि प्रभाकर यांच्यासह किरण आणि संदीप, हृषिकेश आणि अविनाश यांसारख्या प्रसिद्ध शाहिरी जोड्यांनी ही मशाल सतत तेवत ठेवली आहे. याच समृद्ध परंपरेचा भाग म्हणून नरवणच्या भूमीत जन्मलेल्या नव्या पिढीतील कलाकारांनी हे नवीन भक्तिगीत साकारून आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.

"देवा सजूनी झाली ही आरासना" अशा काव्यात्मक ओळींद्वारे गाण्याची सुरुवात होते. बाप्पाच्या आगमनापूर्वी घरातील मंडळी आणि गावकरी ज्या तन्मयतेने मखर, सजावट आणि आरास तयार करतात, त्याचे जिवंत वर्णन या गीतात पाहायला मिळते. "दोन दिवसांवर सण आलाय, आता तरी बाप्पा तू दर्शन दे" ही प्रत्येक भक्ताच्या मनातील आतुरता आणि व्याकुळता या गाण्याच्या शब्दांमधून हुबेहूब व्यक्त झाली आहे.

या गाण्याचे लेखन कवी किरण प्रभाकर बिरवाडकर यांनी अवघ्या दोन दिवसांत केले असून, भक्ताच्या मनातील आतुरता साध्या पण प्रभावी शब्दांत मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. किरण यांनी यापूर्वी अनेक कविता रचल्या असून गावातील सामाजिक, कला व क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. सध्या ते एका नामांकित रुग्णालयात क्लर्क म्हणून कार्यरत असून कामानिमित्त गेली १८ वर्षे परदेशात असले, तरी तेथूनही कोकणातील सांस्कृतिक वसा जपण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. गाण्यात प्रसिद्ध 'किरण आणि संदीप' या जोडीचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

या भक्तिगीताला युवा गायक हृषिकेश प्रभाकर बिरवाडकर यांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजाचा साज लाभला आहे. आपले आजोबा, आई-वडील, शाहीर प्रल्हाद बुवा आणि भाऊ किरण यांच्या आशीर्वादाने त्यांनी गायन क्षेत्रात आपले पाऊल अधिक भक्कम केले आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या हृषिकेश यांनी पुढे तमाशामध्ये शाहीर म्हणूनही ओळख मिळवली. सध्या ते कोकण रेल्वेत कर्मचारी म्हणून कार्यरत असून आपली कला जपण्याचा निरंतर प्रयत्न करत आहेत.

विशेष म्हणजे किरण आणि हृषिकेश हे दोघे सख्खे भाऊ असून गुरुवर्य काशिनाथ बुवा कुंभार यांचे ते सख्खे नातू आहेत. आपल्या आजोबांपासून लाभलेला कलेचा समृद्ध वारसा हे दोघे भाऊ अत्यंत निष्ठेने पुढे चालवत आहेत. "वडील प्रभाकर आणि आई प्रमिला यांनी आम्हांला संस्काराचे धडे शिकविले, तर कुटुंबातील इतर सदस्यांचीही नेहमीच मोलाची साथ लाभते," असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या दोघांचेही प्राथमिक शिक्षण नरवण येथे तर पुढील शिक्षण भेलोशी शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यांना ढोलकी वादन, काव्यलेखन आणि पोवाडे गायनाची विशेष आवड होती. जत्रा व यात्रांमध्ये तमाशाच्या माध्यमातून त्यांनी मोठे नाव कमावून कौतुकाची थाप मिळवली आहे. कलेसोबतच शालेय मित्र आणि विभागातील आपुलकी जपत मैत्री टिकवण्यात हे दोघे भाऊ नेहमीच पुढाकार घेतात. बदलत्या काळासोबत बदलणे गरजेचे असले तरी आपली लोककला जोपासणे तितकेच गरजेचे आहे, असे सांगत हा आपला पहिलाच प्रयत्न असल्याचे किरण बिरवाडकर यांनी स्पष्ट केले.

गाण्याच्या व्हिडिओमध्ये श्रावण मासातील निसर्ग सौंदर्य, नुकतेच झालेले ब्रीद पूजन, ग्रामीण भागातील आरास करण्याचे दृश्य आणि विशेषतः गौरी आगमनाच्या वेळी लेझीमच्या तालावर भान हरपून नाचणाऱ्या नाच-मंडळींचा उत्साह अतिशय सुंदररीत्या टिपण्यात आला आहे. या गाण्याच्या निर्मितीमध्ये 'श्री भैरवनाथ तमाशा मंडळ' (नरवण, ग्रामस्थ व मुंबई मंडळ) यांचे सहकार्य लाभले आहे. गाण्याचे ध्वनीमुद्रण एस. एस. स्टुडिओ येथे झाले असून फोटोग्राफी गणेश नांदवीकर, राज कलमकर तसेच पत्रकार सचिन माळी आणि शाहीर अभि गोलांबडे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

आज नरवण येथील तरुण मंडळी कला क्षेत्रासोबतच विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत राहून आपली लोककला जपत आहेत. गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात प्रदर्शित झालेले हे गाणे सोशल मीडिया व विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुफान प्रसिद्धी मिळवत असून प्रेक्षकांना हे गाणे 'व्हॉइस ऑफ कोकण' (Voice of Kokan) या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. भविष्यात या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गण, गौळण आणि ऐतिहासिक अशा विविध प्रकारची गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे गाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी सर्वांनी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे, असे आवाहन त्यांच्या हितचिंतकांनी केले आहे.

 "बाप्पाच्या आगमनावेळी प्रत्येक घरात चाललेली लगबग आणि आरास करताना भक्ताच्या मनातील आतुरता आम्ही या गीतातून मांडली आहे. नरवणचा सांस्कृतिक वारसा जपत बाप्पाच्या चरणी वाहिलेली ही सेवा भक्तांच्या पसंतीस पडत आहे."— किरण बिरवाडकर (गीतकार)

"आजच्या डिजिटल युगात लोप पावत चाललेली कोकणातील लोककला, शाहिरी आणि परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यातील भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजोबा काशिनाथ बुवा आणि गावातील ज्येष्ठ शाहिरांच्या प्रेरणेनेच आम्ही ही कला जोपासत आहोत."— हृषिकेश बिरवाडकर (गायक)