
सावंतवाडी : वायरमन संदीप फुके यांनी गेल्या दशकभरात निरवडे गावात वीज सेवा खंडित न होऊ देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या वीजविषयक समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. अत्यंत बिकट परिस्थितीतही त्यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
सत्कार सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी श्री. फुके यांनी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य देत ग्रामस्थांना मोलाचे सहकार्य केले आहे, अशा भावना व्यक्त करत त्यांच्या कामाचा गौरव केला. महावितरण कंपनीचे वायरमन म्हणून निरवडे गावात तब्बल १० वर्षे अविरत आणि प्रामाणिक सेवा देणारे कर्मचारी संदीप फुके यांच्या या उल्लेखनीय कार्याची कृतज्ञता म्हणून निरवडे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा हा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी सरपंच सदा गावडे, प्रमोद गावडे, हरी वारंग, अर्जुन पेडणेकर, नागेश गावडे, संतोष गावडे आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.











