
देवगड : देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३ जुलै रोजी होणाऱ्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी अधिक तीव्र झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिठमुंबरी, कुणकेश्वर, कातवण, मिठबाव, हिंदळे, मुणगे तसेच परिसरातील प्रमुख नाक्यांवर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी मोठे लक्षवेधी बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. "अणुऊर्जा प्रकल्पाबाबत अदानी व रिलायन्ससोबत सामंजस्य करार झाला असला तरी प्रकल्पासाठी जागा निश्चित झालेली नाही," या विधानाची आठवण करून देत आंदोलनकर्त्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या बॅनरद्वारे अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याचा संदेश देण्यात येत असून, ३ जुलै रोजी मिठमुंबरी–बागवाडी येथे होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात आंबा–काजू बागायतदार, मच्छीमार, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या बॅनरबाजीमुळे देवगड तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, आगामी जलसमाधी आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











