LIVE UPDATES

पुलावर पाणी ; 30 कुटुंबाचा संपर्क तुटला

तहसीलदार सचिन पाटील मध्यरात्री ‘ॲक्शन मोड’वर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 02, 2026 10:21 AM
views 275  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील उज्वला नदीला आलेल्या पुरामुळे तांबाडगेवाडीचा संपर्क तुटल्याची बातमी प्रसारित होताच, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी मध्यरात्री थेट घटनास्थळी धाव घेत प्रशासकीय तत्परता दाखवली आहे. काल रात्री ११:१५ च्या सुमारास तहसीलदार पाटील यांनी महसूल अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि अडकलेला राडारोडा हटवण्याचे आदेश दिले.

तेंडोली येथील उज्वला नदीच्या पुलाची उंची कमी असल्याने काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले होते. त्यामुळे तांबाडगेवाडीतील २५ ते ३० कुटुंबांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. नदीच्या प्रवाहात मोठी झाडे आणि ओंडके वाहून आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार सचिन पाटील यांनी काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास परिस्थितीची दाहकता पाहण्यासाठी स्वतः नदीवर धाव घेतली. यावेळी पुलाची पाहणी केली असता, नदीच्या पात्रातून वाहून आलेली मोठी लाकडी ओंडकी आणि इतर कचरा पुलाखाली अडकल्याचे दिसून आले. या कचऱ्यामुळे पुलाखालील पाचही नळे  पूर्णपणे बंद झाले होते, ज्यामुळे पाण्याचा निचरा न होता पूरस्थिती निर्माण झाली होती.

रात्री परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर, आज सकाळीच तहसीलदार पाटील यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी जेसीबी (JCB) मशीनच्या सहाय्याने पुलाखाली अडकलेली मोठी ओंडकी आणि राडारोडा हटवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून नदीच्या पाण्याचा निचरा वेगाने होईल आणि ग्रामस्थांना दिलासा मिळेल.

तांबाडगेवाडीला जोडणारा एकमेव लोखंडी साकव (पूल) सध्या जीर्ण अवस्थेत असला तरी तो सद्य परिस्थितीत सुरक्षेची काळजी घेत वापरात आहे. या पुलाची उंची वाढवणे आणि नवीन साकव तयार करणे याबाबात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. या संवेदनशील परिस्थितीची दखल घेऊन, पूल आणि साकव यांच्या सद्यस्थितीबाबतचा सविस्तर अहवाल आजच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.

या मध्यरात्रीच्या पाहणी दौऱ्यात तहसीलदार सचिन पाटील यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार, स्थानिक तलाठी, पोलीस पाटील आणि गावातील संतप्त व चिंताग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तात्काळ पावले उचलल्यामुळे ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणाऱ्या अहवालानंतर पुलाची उंची वाढवण्याच्या कायमस्वरूपी कामाला कधी मंजुरी मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.