LIVE UPDATES

तिर्लोट ग्रामस्थांचे उपोषण तात्पुरते स्थगित

सभापतींच्या विनंतीला मान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 02, 2026 17:46 PM
views 34  views

न्यायासाठीचा लढा कायम : तात्या सारंग

देवगड : तिर्लोट ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या उपोषणाबाबत पंचायत समिती प्रशासनाचा प्रमुख म्हणून आपण स्वतः पुढाकार घेत ग्रामस्थांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. प्रकरणाची सखोल माहिती घेऊन न्याय देण्याची हमी दिल्यानंतरच आंदोलनकर्त्यांनी रात्री उशिरा उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी दिली.


सभापती गणेश राणे म्हणाले, "बुधवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास या उपोषणाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पंचायत समितीचा सभापती या नात्याने प्रकरणाची सखोल माहिती घेऊन संबंधितांना न्याय देण्याची हमी दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखत रात्री उशिरा उपोषण तात्पुरते स्थगित केले."

दरम्यान, तिर्लोट ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमिततेची चौकशी करून संबंधित अहवाल ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी तिर्लोट येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सावंत यांच्यासह सुमारे ३० ग्रामस्थांनी बुधवारी देवगड पंचायत समिती कार्यालयात उपोषण सुरू केले होते. दिवसभर आंदोलन सुरू राहिल्यानंतरही आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.

याबाबत आंदोलनकर्ते तात्या सारंग यांनी सांगितले की, "आम्ही बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत उपोषणस्थळी ठामपणे बसलो होतो. सभापती गणेश राणे यांनी आमच्याशी संपर्क साधून प्रकरणात न्याय देण्याची हमी दिली.

 त्यांची विनंती, तसेच पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र आमचा लढा संपलेला नाही. ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील."आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही संबंधित चौकशी अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी पंचायत समिती कार्यालयात चर्चेसाठी बोलावण्यात आले असले तरी संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.पावसाची तीव्रता आणि सभापतींनी दिलेली न्यायाची हमी यामुळे उपोषण सध्या स्थगित करण्यात आले असले, तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि संबंधित प्रकरणात योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार तिर्लोट ग्रामस्थांनी व्यक्त केला.