
कुडाळ :१८ जानेवारी २०२५ रोजी झालेली मारहाण आणि त्यानंतर मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेल्या खटल्याचा निकाल ७ जुलै २०२६ रोजी लागला. मात्र, या निकालातून मिळालेली शिक्षा पुरेशी नसल्याची भावना तक्रारदार बाबल पावस्कर यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाविरुद्ध आता अधिक शिक्षेची मागणी करत आपण दिल्ली येथील मानव अधिकार आयोगाकडे धाव घेणार असल्याचे पावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.
बाबल पावस्कर यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक कुडाळ (PI) राजेंद्र मखदूम यांच्यावर मारहाणीचा आणि अन्यायाचा गंभीर आरोप केला होता. या घटनेनंतर पावस्कर यांनी मुंबई येथील मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली होती. सुमारे दीड वर्ष चाललेल्या या कायदेशीर प्रक्रियेनंतर ७ जुलै २०२६ रोजी आयोगाने निकाल दिला. परंतु, हा निकाल आपल्या अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगत पावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचा संदर्भ देत बाबल पावस्कर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना साकडे घातले आहे. "जर एखाद्या अधिकाऱ्याकडून सामान्य नागरिकांनाअशी वागणूक दिली जात असेल, तर ती गंभीर बाब आहे. अशा प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी," अशी मागणी पावस्कर यांनी लावून धरली आहे.
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वादावर अधिक भाष्य करणे टाळले. "मानव अधिकार न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे. त्यांना जर या निर्णयावर समाधान नसेल किंवा उच्च न्यायालयात/वरिष्ठ स्तरावर तक्रार करायची असेल, तर तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. ते तिथे दाद मागू शकतात," असे मखदूम यांनी स्पष्ट केले. आता बाबल पावस्कर यांच्या या भूमिकेनंतर हे प्रकरण दिल्लीच्या पातळीवर कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










