LIVE UPDATES

जिल्हा परिषदेत खातेप्रमुखांवर संतापाचा स्फोट

बांधकाम समितीच्या सभेला दांडी; सदस्यांचा आक्रमक पवित्रा, सीईओंकडून लेखी नोटिसांचे आदेश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 18:30 PM
views 38  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मासिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली. महत्त्वाच्या विभागांचे खातेप्रमुख सभेला अनुपस्थित राहिल्याचे उघड होताच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले. शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे अधिकारी सभेला गैरहजर राहिल्याने वातावरण चांगलेच तापले.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस सभाध्यक्ष संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य संदेश उर्फ गोठ्या सावंत, प्रमोद रावराणे, रुपेश कानडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी प्रमोद रावराणे यांनी खातेप्रमुखांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित अधिकारी स्वतः उपस्थित नसून त्यांच्या जागी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे समोर येताच सदस्यांचा संताप अनावर झाला.

सदस्य संदेश उर्फ गोठ्या सावंत यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत, “जिल्हा परिषदेच्या अधिकृत सभेला अधिकारी स्वतः उपस्थित राहत नसतील, तर ही लोकप्रतिनिधींची अवहेलना आहे. अधिकाऱ्यांना सभेचे गांभीर्य राहिलेले नाही का?” असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर सभाध्यक्षांनी संबंधित सर्व खातेप्रमुखांना तातडीने सभागृहात हजर राहण्याचे निर्देश दिले.

यानंतर एकामागून एक अधिकारी सभागृहात दाखल झाले. मात्र त्यांच्या गैरहजेरीबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने सदस्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी असल्याचे कारण दिले. यावर संदेश सावंत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “जर जिल्हा परिषद समितीच्या बैठकीपेक्षा इतर बैठका महत्त्वाच्या असतील, तर जिल्हा परिषदेच्या समित्यांचे अस्तित्व तरी कशासाठी?” असा सवाल उपस्थित केला.

सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने मोठ्या आवाजातील चर्चेमुळे बाहेरील कर्मचारीही सभागृहाबाहेर जमा झाले. दरम्यान, सदस्यांनी हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या निदर्शनास आणून दिला. घटनेची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड तातडीने सभागृहात दाखल झाले.

संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीच्या बैठकीला विनापरवानगी अनुपस्थित राहणे गंभीर बाब असून अशा सर्व खातेप्रमुखांना लेखी नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिस्तभंगात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सभाध्यक्ष साटविलकर यांची स्पष्ट भूमिका

सभाध्यक्ष संतोष साटविलकर यांनीही अधिकाऱ्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत, “समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहायचे असल्यास सभाध्यक्षांची पूर्वपरवानगी घेणे किंवा लेखी स्वरूपात कारण कळविणे बंधनकारक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या नियमांचे पालन केले नसल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट केले.