LIVE UPDATES

देवगडच्या सरपंच समितीच्या सभेत विकासकामांवर सविस्तर मंथन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 17, 2026 19:10 PM
views 24  views

देवगड : देवगड तालुका सरपंच समितीची सभा नुकतीच पंचायत समिती देवगड येथे पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६२ च्या कलम ७७ अन्वये लोकसंख्येच्या निकषावर गठित करण्यात आलेल्या तालुका सरपंच समितीची ही महत्त्वपूर्ण बैठक असून, तालुक्यातील ग्रामविकासाशी निगडित विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेच्या प्रारंभी समितीचे सभापती गणेश राणे यांनी उपस्थित सरपंचांचे स्वागत केले.त्यानंतर ग्रामपंचायतींच्या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पंधरावा वित्त आयोग निधी, स्वच्छ भारत अभियान, पशुसंवर्धन विभागातील औषधांची कमतरता, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), वीज जोडणी, ग्रामीण आरोग्य सुविधा, जलजीवन मिशन, सौर हायमास्ट दिवे, तसेच विविध प्रलंबित विकासकामांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

किंजवडेचे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी ग्रामविकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. दाभोळे सरपंच यांनी देवगड-निपाणी मार्गावरील पिकअप शेडची झालेली दुरवस्था, प्रादेशिक नळ योजनेअंतर्गत अनियमित पाणीपुरवठा, तसेच विकासकामांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींकडे त्यांनी सभेचे लक्ष वेधले.तसेच दाभोळेच्या सरपंचांनी जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण राहिलेली कामे, सौर हायमास्ट दिव्यांची गरज, आरोग्यविषयक सुविधा आणि इतर स्थानिक समस्यांबाबत मुद्देसूद मांडणी केली. विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनीही आपल्या गावांतील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न उपस्थित करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

सभेतील सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत पंचायत समितीच्या आगामी सभेत संबंधित विभागांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उपसभापती अमोल लोके यांनी दिले. ग्रामविकासाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस कुणकेश्वरचे प्रशासक महेश ताम्हणकर, पुरळ ग्रामपंचायतीच्या प्रशासक अनुश्री तावडे, पोभुर्ले सरपंच प्रियंका धावडे, गिर्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच लता गिरकर, मुणगेच्या सरपंच अंजली सावंत, तिर्लोटच्या सरपंच रितिका जुवाटकर आदी उपस्थित होते.