
वैभववाडी : विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, पौष्टिक आहाराविषयी जागरूकता आणि स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून आठवडा बाजारात रानभाजी महोत्सव उत्साहात झाला.
महोत्सवाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध प्रकारच्या पौष्टिक रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पोषणमूल्ये आणि दैनंदिन आहारातील महत्त्व याबाबत माहितीपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक अन्नसंस्कृतीचे जतन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे, नगरसेवक रोहन रावराणे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक विजय रावराणे,महेश संसारे, माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा बिराजदार, पंचायत समिती अधीक्षक श्री. देसाई, ग्राम अधिकारी विद्याधर सावंत, कृषी अधिकारी प्रवीण कुडतरकर, प्रमोद सावंत, मुख्याध्यापक बी. एस. नादकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











