
देवगड : देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेची ओळख, पारंपरिक आहाराचे महत्त्व आणि पोषणमूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने 'रानभाज्या प्रदर्शन व विक्री' तसेच 'खाऊ गल्ली आणि गावठी बाजार' या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिय समिती सचिव ॲड. अविनाश माणगावकर ,शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे व संस्थेचे सदस्य दयानंद पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, परिश्रमाचे आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
प्रदर्शनात परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांची माहिती, त्यांची ओळख, औषधी गुणधर्म, पोषणमूल्ये व उपयोग यांचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक रानभाजीची माहिती आत्मविश्वासाने उपस्थितांना समजावून सांगितली. तसेच रानभाज्यांपासून तयार केलेले विविध स्वादिष्ट व पौष्टिक पदार्थही प्रदर्शनात मांडण्यात आले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या 'खाऊ गल्ली' आणि 'गावठी बाजार' या विशेष आकर्षणांमुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. विद्यार्थ्यांनी घरगुती व पारंपरिक खाद्यपदार्थ, गावठी उत्पादने आणि विविध वस्तूंची विक्री करून उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पालक, ग्रामस्थ आणि उपस्थितांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमात प्रशालेतील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गसंवर्धन, पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन, आरोग्यदायी आहाराचे महत्त्व, आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान तसेच आत्मविश्वास आणि संवादकौशल्य विकसित करण्याचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रविण खडपकर, सहाय्यक शिक्षक सुरेश पवार, ज्ञानेश्वर कुंभरे ,शिक्षिका आफरीन पठाण व रश्मी ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेचच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या संपूर्ण उपक्रमाला स्थानीय समिती खजिनदार दत्तात्रय जोशी, उपाध्यक्षा अर्चना नेने, स्थानीय समिती सदस्य . मिलिंद कुबल तसेच पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे या उपक्रमाच्या आयोजनाबाबत कौतुक केले. विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मुख्याध्यापक प्रविण खडपकर आणि शाळा समिती अध्यक्ष . चंद्रकांत शिंगाडे यांनी मनःपूर्वक आभार मानले .










