
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जावर जिल्हा परिषद महिला व बाल विकास समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पांढऱ्या वाटाण्यात अळी आढळत असून तो शिजतही नसल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला. तसेच मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहारात साखरेऐवजी गुळाचा समावेश करावा, तसेच वाटाण्याऐवजी मूग व मटकी देण्याचा ठरावही सभेत करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी (३ ऑगस्ट) महिला व बाल विकास समितीची सभा सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभारी सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, सदस्य मिलिंद नाईक, हर्षदा वाळके, अवनी तेली, सुप्रिया मेस्त्री, आरती पाटील, क्षमा हडकर, शोभा गावडे तसेच तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
सभेत कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित करत, मुलांना दिला जाणारा पांढरा वाटाणा निकृष्ट दर्जाचा असून त्यामध्ये अळी आढळत असल्याचे सांगितले. हा वाटाणा व्यवस्थित शिजतही नसल्याने मुलांना त्याचा उपयोग होत नाही. पांढऱ्या वाटाण्यातून कोणती पोषणमूल्ये मिळतात, असा सवाल करत त्याऐवजी मूग व मटकीचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर संबंधित साहित्याचा पुरवठा शासन स्तरावरून होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पोषण आहाराचा पुरवठा स्थानिक स्तरावरून करण्याबाबतही सभेत चर्चा झाली. मुलांच्या आरोग्यासाठी साखरेऐवजी गूळ देण्याची मागणीही वाळके यांनी केली. साखरेचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता पोषण आहारात गुळाचा समावेश करण्याचा ठराव समितीने मंजूर केला.
'रिक्त पदांचे कारण आम्हाला नको; सीईओंना सांगा
दरम्यान, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान एकदा तरी अंगणवाड्यांना भेट देण्याची सूचना सदस्यांनी केली. त्यावर काही अधिकाऱ्यांनी अनेक पदांचा अतिरिक्त पदभार असल्याने प्रत्येक अंगणवाडीला नियमित भेट देणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर सदस्य मिलिंद नाईक यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, "रिक्त पदे आणि अतिरिक्त पदभाराचे कारण सदस्यांना सांगू नका; तो विषय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडा. सदस्यांनी भेटी द्यायला सांगितल्या आहेत, तर त्या द्याच," अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.










