LIVE UPDATES

दोडामार्ग शहरात मोकाट गुरांचा हैदोस

Edited by:
Published on: August 03, 2026 19:36 PM
views 19  views

दोडामार्ग : शहरात मोकाट गुरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिक, व्यापारी आणि ग्राहक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच बाजारपेठेत गुरे मुक्तपणे वावरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या पिशव्यांमधील भाजीपाला, धान्य किंवा खाद्यपदार्थ हिसकावून नेण्याचे प्रकार सर्रास घडत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोडामार्गच्या गजबजलेल्या बाजारपेठेत सकाळपासून सायंकाळपर्यंत मोकाट गायी व बैलांचा वावर सध्या दिसून येतो. ग्राहक खरेदी करून बाहेर पडताच त्यांच्या हातातील पिशव्या गुरांकडून ओढून नेल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी गुरे थेट रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने  अपघाताची शक्यता वाढली आहे. व्यापाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, दुकानासमोर सतत गुरे उभी राहत असल्याने ग्राहक दुकानात येण्यास कचरतात. अनेक वेळा दुकानातील माल नेस्तनाबूत करतात.

ग्राहकांनीही प्रशासनावर संताप व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, गुरांचे मालक त्यांना रस्त्यावर मोकाट सोडून देतात, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. नगरपंचायत प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मोकाट गुरांचा  बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.