
देवगड : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आयोजित वारकरी दिंडी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात अभंग, टाळ-मृदंगाचा निनाद, पालखी मिरवणूक, नृत्य आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांमुळे वृद्धाश्रमात जणू पंढरीच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिकात्मक मूर्तीच्या पूजनाने झाली. संस्थेचे संचालक अविनाश फाटक व सौ. फाटक तसेच दत्तात्रय हादगे व सौ. हादगे यांच्या हस्ते प्रथम पूजेचा मान संपन्न झाला. यावेळी दत्तात्रय हादगे म्हणाले, "आम्ही दरवर्षी या दिंडीत सहभागी होतो. यंदा विठ्ठल-रखुमाईच्या प्रथम पूजेचा मान मिळाल्याने आम्ही स्वतःला धन्य समजतो. या दिंडीच्या माध्यमातून मनाला भक्तीची नवी ऊर्जा मिळते आणि विठ्ठलभक्तीचा आनंद द्विगुणित होतो."
सकाळी दहा वाजता प्रथम पूजनानंतर विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग गायन, वारकरी नृत्य, पथनाट्य, पालखी मिरवणूक, पालखी नाचविणे आणि फुगड्यांचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. दिविजा वृद्धाश्रमापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत वृद्धाश्रमातील आजी-आजोबा, मान्यवर आणि उपस्थित भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संस्थेच्या मैथिली फाटक म्हणाल्या, "प्रत्येक आजी-आजोबांना पंढरपूरला घेऊन जाणे शक्य नसते. म्हणून आम्ही येथेच पंढरीचा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. देव हा मंदिरातच नसून प्रत्येक माणसाच्या हृदयात आणि सेवाभावात आहे. त्या भावनेतून आम्ही सातत्याने असे उपक्रम राबवतो. आज या कार्यक्रमातून आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच आमच्यासाठी खरा विठ्ठलाचा आशीर्वाद आहे."
या कार्यक्रमासाठी मुंबईहून विशेष उपस्थित असलेल्या श्री. व सौ. तेलतुंबडे यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. "ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. सचिव संदेश शेटये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले नियोजन, व्यवस्थापन आणि वृद्धांविषयीची आत्मीयता कौतुकास्पद असून संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे," असे त्यांनी सांगितले. यावेळी उल्लास फाटक, परी फाटक, सखाराम नारायणकर, साधना तेलतुंबडे, सचिव संदेश शेटये, अशोक काजरेकर, प्रमोदिनी मारणे, महेश्वरी मारणे, कार्तिकी मारणे, आनंद बाणे तसेच स्थानिक व मुंबई मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










