
वैभववाडी : कविवर्य नारायण सुर्वे हे शेवटपर्यंत कामगार म्हणून जगले. फुटपाथ हाच त्यांच्या कवितेचा मंच होता. हेत येथे उभारण्यात येणारे त्यांचे स्मारक हे साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचे केंद्र बनावे, यासाठी त्याची योग्य देखभाल करून विविध साहित्यिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य तथा कवी वामन पंडित यांनी केले.
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हेत येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि निलायम कृष्णकक्ष, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अगा... मी जगमय झालो’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कवी वामन पंडित यांनी सुर्वे यांच्या कवितांचे सादरीकरण केले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संपादकीय सल्लागार वर्षा देवरूखकर, कवयित्री सौ. रूंदा कांबळी, म. ल. देसाई, डॉ. शरयू असोलकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, कांचन कांबळे आदी उपस्थित होते.
कवी वामन पंडित यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक प्रवासावर प्रकाश टाकताना सांगितले की, सुर्वे यांनी आयुष्यभर कामगार म्हणून जगण्याचा अनुभव घेतला. फुटपाथपासून सुरू झालेल्या त्यांच्या जीवनप्रवासाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमध्ये उमटले. श्रमिक, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाचे जगणे हे त्यांच्या साहित्याचे प्रमुख केंद्र राहिले. त्यांच्या साहित्याने समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या.
नारायण सुर्वे यांचे सात कविता संग्रह प्रसिद्ध असून त्यांनी गद्य लेखनही केले आहे. त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी ‘मास्तरांची सावली’ हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत सुर्वे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
सुर्वे यांच्या साहित्यिक योगदानाच्या स्मृती जतन करण्यासाठी हेत येथे शासनाच्या माध्यमातून स्मारक उभारले जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे पंडित यांनी सांगितले. या स्मारकात भव्य ग्रंथालय उभारण्यात येणार असून भविष्यात देशाच्या विविध भागांतून साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी येथे येतील. त्यामुळे स्मारकाची देखभाल, दुरुस्ती आणि जतन करण्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांनीही स्वीकारणे आवश्यक आहे. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी साहित्यिक प्रेरणेचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भालचंद्र साठे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून स्मारकासाठी १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. लवकरच हेत येथे सुसज्ज आणि भव्य स्मारक उभे राहील, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षक फोंडके यांनी केले.













