LIVE UPDATES

ओरोसमध्ये श्रमदानातून बंधारे उभारणीला प्रारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 03, 2026 19:43 PM
views 31  views

ओरोस : उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओरोस येथे लोकसहभाग आणि श्रमदानातून बंधारे बांधण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत ओरोस सुलोचना नगर तसेच देऊळवाडी येथील गोविंद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे यशस्वीरीत्या बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले आहे.

सुलोचना नगर येथे बंधाऱ्याची उभारणी

ओरोस सुलोचना नगर येथे लोकसहभागातून बंधारा घालण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोसच्या सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडुरंग मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य गौरव घाडीगावकर, योगिता मुंज आणि स्काऊट गाईड प्रमुख अंजली माहूर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी प्रत्यक्ष श्रमदान करून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.

देऊळवाडी येथे दुसरा बंधारा पूर्ण

याच उपक्रमांतर्गत ओरोस देऊळवाडी येथील गोविंद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे दुसऱ्या बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पार पडले. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडुरंग मालवणकर, ग्रामपंचायत सदस्य पळसमकर, माजी उपसरपंच सुहास परब, ग्रामसेवक कदम व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत जेसीबी या सहाय्याने बंधारा उभारला.

येत्या आठ दिवसांत बंधाऱ्यांचे विशेष नियोजन

येत्या आठ दिवसांच्या कालावधीत परिसरात जास्तीत जास्त बंधारे बांधून पाणी अडवण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रमदानातून उभ्या राहणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल आणि आगामी काळात गावातील पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.