LIVE UPDATES

जुन्या मुंबई-गोवा हायवेवर तुंबतंय पाणी

नगरसेवकांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 02, 2026 16:33 PM
views 46  views

  • कोलगाव दरवाजासमोरील प्रकार 

सावंतवाडी : शहरातील बाहेरचावाडा भागातील मुख्य रस्त्यालगतचे गटार बांधकाम करून ते बंदिस्त करण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक तौकीर शेख, देवेंद्र टेमकर आणि 'सामाजिक बांधिलकी'च्या समिरा खलील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार, जावेद शहा आदी उपस्थित होते. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना सादर केले आहे सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील बाहेरचावाडा परिसरातील कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत 'कोलगांव दरवाजा ते लतीफ बेग घरापर्यंतच्या' रस्त्यालगतचे गटार बांधकाम करून ते बंदिस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच, याच रस्त्यावरील 'हॉटेल सागर पंजाब ते नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या' रस्त्यालगतचे गटारही बांधून बंदिस्त करण्याची गरज आहे. सध्या या रस्त्यावरील गटार बुजल्यामुळे आणि पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने पाणी वाहून जाण्यास मार्ग उरलेला नाही. 

परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता जलमय होतो. ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही कामांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.