
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये एमसॅन्ड प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतच्या माणसाने चक्क २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप उपनगराध्यक्ष देविदास गवस यांनी मासिक सभेत केल्याने एकच खळबळ उडाली. इतर गावात ग्रामस्थ हा प्रकल्प होण्यासाठी विरोध करतात आणि नगरपंचायत हद्दीत हा प्रकल्प होतो कसा? असा आक्रमक सवाल उपस्थित करत खडाजंगी केली.
कसई दोडामार्ग नगरपंचायतची मासिक सभा आज मंगळवारी येथील नगरपंचायतच्या सभागृहात उपनगराध्यक्ष देविदास गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, राजू प्रसादी, रामराव गावकर, पाडुरंग बोर्डेकर, महिला नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष गवस म्हणाले की नगरपंचायत हद्दीत एमसॅन्ड प्रकल्प होण्यासाठी कोणीतरी 25 लाख घेतले. हा काय प्रकार चाललाय नगरपंचायत मध्ये? असा आक्रमक प्रश्न उपस्थित करत सभागृहात खडाजंगी झाली. यावरून माजी नगरध्यक्ष व नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, राजू प्रसादी आदींनी आक्रमक भूमिका घेत चौकशीची मागणी केली. यावेळी अध्यक्ष गवस यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.











