
कणकवली : देवगड - निपाणी राज्य मार्गाचे काम सुरु असून यात सध्या दाजीपूर ते फोंडाघाट रस्त्याचे काम सुरु आहे. सदरचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. परिणामी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित शासकीय विभागाने येत्या आठ दिवसांत याकडे लक्ष न दिल्यास, कामाचा दर्जा सुधारल्यास घाटबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पिळणकर म्हणाले, सध्या देवगड - निपाणी मार्गाचे काम सुरु आहे. यात दाजीपूर ते फोंडाघाट या रस्त्याचे काम सुरु असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. परिणामी हा रस्ता, घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. सदरचे काम त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला देऊन संबंधित विभागाने मोठी चुक केली आहे. कारण हे काम करणार्या कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. असे असताना या सर्वांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.
पिळणकर पुढे म्हणाले, देवगड -निपाणी रस्त्याची दुरुस्ती होतेय, ही चांगलीच बाब आहे. मात्र, आमचा आक्षेप निकृष्ट कामाला आहे. घाटमार्गात काम सुरु असतानाही तेथे ठेकेदार कंपनीचा एक माणूस नसतो. तेथे कोणतेही दिशादर्शक बोर्ड नाहीत. परिणामी खासकरून दुचाकींचा अपघात होत आहे. आता घाटाच्या पायथ्याचे काम सुरु करण्यात आले असून तेही निकृष्ट दर्जाचे आहे. काँक्रीटीकरणात मोठ्या प्रमाणात गिरीटचा वापर केला जात आहे, असेही पिळणकर म्हणाले.
सदर रस्ता कामाचा ठेकेदार पुण्यात बसून कारभार चालवत आहे. या कामात संबंधित शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी यांचे जराही लक्ष नाही. खरेतर या ठेकेदार कंपनीला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकायला हवे. कारण गेली एक वर्ष या कंपनीने घाटमार्ग खणून ठेवलाय. म्हणूनच येत्या आठ दिवसांत संबंधित विभागांनी यामध्ये लक्ष न घातल्यास, कामाचा दर्जा न सुधारल्यास सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन घाटबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा पिळणकर यांनी दिला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








