
देवगड : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तळेबाजार व बागतळवडे येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी तळेबाजार येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकरी परंपरेचे दर्शन घडवत आकर्षक वेषभूषेत वारकरी दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, यांसह विविध वारकरी संतांच्या वेशभूषेत सजलेल्या बालकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषात दिंडीत सहभाग घेतला.
यावेळी बालकांनी अभंग, भजन, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. लहान वयातच मुलांमध्ये वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि भारतीय परंपरेची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ तसेच मंदिरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पालकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.











