LIVE UPDATES

उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठूराय

देवगडच्या कलाकाराची अनोखी कलाकृती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 24, 2026 18:15 PM
views 119  views

देवगड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीभाव यांचा सुरेख संगम घडवणारी वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारली आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या उपरण्यावर भगवान श्री विठ्ठलाचे हस्तचित्र रेखाटून त्यांनी भक्तीला कलात्मक अभिव्यक्ती दिली आहे.

सर्वसाधारणपणे कॅनव्हासवर चित्रे साकारली जात असताना, अक्षय मेस्त्री यांनी पारंपरिक उपरण्याची निवड करून आपल्या कलेतून वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी परंपरेत उपरणे हे सन्मान, शुद्धता, सेवाभाव आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे याच उपरण्यावर विठ्ठलाचे चित्र साकारत आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

या कलाकृतीतून "भक्ती, संस्कृती आणि कला" यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. नव्या पिढीने आपल्या परंपरा, संस्कृती आणि वारकरी संप्रदायाशी नाते अधिक दृढ करावे तसेच भारतीय कलेचा अभिमान जपावा, हा या कलाकृतीमागील प्रमुख उद्देश असल्याचे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी सांगितले.

ऍक्रेलिक रंगांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या चित्राची उंची ३ फूट तर रुंदी २.५ फूट असून, त्याच्या बारकाव्यांमधून विठ्ठलभक्तीचे तेजस्वी आणि मनोभावे दर्शन घडते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील या अभिनव कलाकृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.