LIVE UPDATES

'बुके ऐवजी बंधारा, पोस्टर ऐवजी आरोग्य सेवा'

विशाल परब यांच्या वाढदिनी उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 18:21 PM
views 46  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर राबविण्यात आलेल्या सेवा अभियानाचा पुढचा टप्पा म्हणुन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजोपयगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 'बुके ऐवजी बंधारा, पोस्टर ऐवजी आरोग्य सेवा' अशी याची संकल्पना असणार असल्याची माहिती सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्या सुचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. परब यांनी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपसभापती गौरव मुळीक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संतोष राऊळ,  प्रसन्न देसाई, पप्पू परब, सुहास गवंडळकर, जितेंद्र गांवकर, प्रशांत सुकी, शिवानी नाईक, हेमंत नाईक, प्रथमेश सावंत, हेमंत मराठे, हितेन नाईक, विनेश तावडे, रंगनाथ गवस, देवेंद्र शेटकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. निरवडेकर म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर पासून कच्चे बंधारे उभारण्यास प्रारंभ होणार आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, भूजलपातळी टिकवणे आणि शेतीसाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यात सहभागी होणार आहे. उद्या आरवली वेतोबा मंदीर येथून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

११ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान रेडी, मळेवाड, आरोंदा, बांदा, आंबोली, उभादांडा, तुळस, आडेली, मणेरी, साटेली भेडशी, माटणे, दोडामार्ग शहर, कोलगाव, माडखोल, माजगाव, इन्सुली, सावंतवाडी शहर, तळवडे, म्हापण आदी जिल्हा परिषद मतदारसंघात बंधारे बांधण्यात येणार आहे. भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्तांचा तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत पोहचणारा पक्ष आहे. पार्लमेंट टू पंचायत पर्यंत विकासात्मक कार्य करणारा आमचा पक्ष असून पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या आवाहनानुसार सिंधुदुर्गात दुष्काळ जाहीर झाल्याने बंधारे बांधण्यासह सामाजिक उपक्रमांवर आमचा भर असणार आहे.

'बुके ऐवजी बंधारा, पोस्टर ऐवजी आरोग्य सेवा' या ब्रीदवाक्याने आम्ही २ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळापर्यंत जाऊन ५० बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पाण्यापासून आपण वंचित राहणार नसून भविष्यात पाण्याची समस्या जाणवणार नाही. तसेच सावंतवाडीत विविध ठिकाणी लागणारे बॅनर बघता पोस्टर ऐवजी त्या पैशांच्या बदल्यात आरोग्य सेवा करण्यावर आमचा भर आहे. बॅनर ऐवजी आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहेत. तसेच  सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील तिन्ही नगरपरिषदांना 'वैकुंठ रथ' देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. भाजपच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत अशी माहिती त्यांनी दिली. 

दरम्यान, भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, वाढदिवसाच्या निमित्ताने बुके न आणता बंधाऱ्यासाठी योगदान द्यावे, जसं शक्य होईल तसं सहकार्य करावे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सेवा संकल्प करत विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस लोकहिताचे उपक्रम राबवण्यावर भर दिला. आज देशासह राज्यावर दुष्काळाची परिस्थिती आली आहे.

यावर्षी काही भागात गणेश विसर्जनाच्या मुर्त्या कमी पाण्यात दिसत आहे‌त. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस किंवा इतर उत्सव साजरे न करता गोरगरीब जनतेसाठी पाण्याचा संचय करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे वाढदिनी मोठे कार्यक्रम न घेता बंधारा बांधण्यासह आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहे. १७ जिल्हा परिषद व ३ शहरांत किमान ५० बंधारे उभारण्यावर आमचा भर आहे‌. पालकमंत्री नितेश राणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

रविंद्र चव्हाण व नितेश राणे यांनी यासाठी प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहनही केलं आहे. उद्या आरवली वेतोबा मंदीर येथून हे बंधारे बांधण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पाणी अडवून ते जमीनीत जिरवण्यावर आमचा भर राहणार आहे‌. तर ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान 'महा आरोग्य शिबिरा'चे आयोजन करण्यात येणार आहे‌. केएलई सारख्या हॉस्पिटलची टीम यासाठी उपलब्ध असणार आहे. केवळ तपासणी नाही तर उपचार देखील करण्यावर आमचा भर राहणार आहे.

ग्रामीण भागात शववाहिनी नसल्याने अनेकदा आमच्या लोकांना समस्यांना सामोरं जाव लागत. गाडी मिळत नसल्याने मिळेल त्या वाहनाने मृतदेह स्मशानभूमीत न्यावा लागतो. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून तिन्ही शहरातील नगराध्यक्षांकडे हे 'वैकुंठ रथ' सुपूर्द केले जाणार आहेत.