
दोडामार्ग : नगरपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार झाला असेल, विकासकामांचा दर्जा संशयास्पद असेल आणि डुप्लिकेट ठेकेदारांचा वावर असेल तर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी ठाकरे शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांनी केली आहे. नगरपंचायतीच्या कारभाराबाबत सत्ताधारी नगरसेवकांनीच अनेक प्रश्न उपस्थित केल्याने आपण सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो असेही गवस यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
दोडामार्ग नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या कारभारात तसेच विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्याचे समोर आले आहे. याशिवाय नगरपंचायतीमध्ये ‘डुप्लिकेट ठेकेदारांचा’ वावर असल्याचा आरोपही करण्यात आल्याने नगरपंचायतीच्या कारभाराबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. या सर्व आरोपांची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे संजय गवस यांनी सांगितले. यासाठी प्रथम नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित आरोपांबाबत विचारणा करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.
विकासकामांच्या दर्जावरही संशय
मासिक सभेत उपस्थित सत्ताधारी नगरसेवकांनी काही विकासकामांच्या दर्जाबाबतही संशय व्यक्त केल्याचे संजय गवस यांनी सांगितले. डुप्लिकेट ठेकेदारांकडून करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रांची तपासणी आणि आवश्यक असल्यास तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘एम सॅंड’ प्रकल्प सुरू करण्यासाठी नगरपंचायतीकडून २५ लाख रुपयांची मागणी कोणी केली? असा गंभीर प्रश्न विद्यमान उपनगराध्यक्षांनी उपस्थित केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या आरोपाचीही सखोल चौकशी होऊन नेमकी वस्तुस्थिती काय आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी संजय गवस यांनी केली आहे.
नगरपंचायतीच्या सभेत सत्ताधारी नगरसेवकांकडूनच अशा प्रकारचे आरोप करण्यात येत असतील, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आरोपांमध्ये तथ्य असल्यास संबंधित अधिकारी, पदाधिकारी किंवा ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गवस यांनी केली.
पत्रकारांवरील दबावाचा निषेध
दरम्यान, नगरपंचायतीच्या सभागृहात घडणाऱ्या घटना, चर्चा आणि निर्णय जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न निंदनीय असल्याचे संजय गवस यांनी म्हटले. पत्रकारांवरील दबावाचा ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. अशा प्रकारची वृत्ती लोकशाहीसाठी आणि समाजासाठी घातक असल्याचेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा आगामी नगरपंचायत निवडणुकीत परिणाम जाणवेल, असा इशाराही त्यांनी दिला












